आगामी लोकसभा निवडणुकीसाठी पक्षाच्या तयारीवर चर्चा करण्यासाठी भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रचारप्रमुख आणि गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी मुंबईत पक्षाच्या राज्यातील नेत्यांसोबत बैठक घेतली. दरम्यान, या बैठकीला पक्षाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी अनुपस्थित राहिल्यामुळे राजकीय वर्तुळात वेगळीच चर्चा रंगली.
मोदी आपल्या नियोजित कार्यक्रमांसाठी गुरुवारी मुंबई दौऱयावर आले आहेत. प्रचारप्रमुखपदी नियुक्ती झाल्यावर मोदी यांची ही पहिलीच मुंबई भेट आहे. मोदी यांनी राज्यातील नेत्यांसोबत महाराष्ट्रातील राजकीय स्थिती, पक्षसंघटना आणि शिवसेनेसोबतची युती या विषयांवर चर्चा केली. या बैठकीला पक्षाचे सरचिटणीस आणि महाराष्ट्राचे प्रभारी राजीव प्रताप रुडी, राष्ट्रीय प्रवक्ते प्रकाश जावडेकर, पक्षाचे लोकसभेतील उपनेते गोपीनाथ मुंडे, प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस, विधानसभेतील विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते विनोद तावडे आदी नेते उपस्थित होते.
मोदी हे सध्या लोकसभा निवडणुकीसाठी प्रत्येक राज्यातील पक्षाची तयारीसंदर्भात बैठका घेत आहेत, असे जावडेकर यांनी या बैठकीपूर्वी पत्रकारांना सांगितले.