News Flash

या वर्षी पाऊस कमीच

गेल्या दोन महिन्यांत मुसळधार पाऊस शून्यावर

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

गेल्या दोन महिन्यांत मुसळधार पाऊस शून्यावर

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत या वर्षी पाऊस कमी प्रमाणात पडल्याचे हवामान खात्यांच्या आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. या वर्षी ऑगस्ट आणि सप्टेंबर या दोन महिन्यांमध्ये मुसळधार पाऊस पडलेला नसल्याने जून ते सप्टेंबर महिन्यातील एकूण पावसाच्या प्रमाणावर याचा परिणाम झालेला दिसून येतो.

सरासरी ६४.५ मिलिमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्यास मुसळधार पाऊस पडल्याचे नोंदण्यात येते. २०१४ साली जून ते सप्टेंबर काळात कुलाबा येथे २१३५ मिलिमीटर आणि सांताक्रूझ येथे २३०० मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. या वेळी ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये केवळ एकच दिवस मुसळधार पाऊस पडला होता. २०१५ साली तर केवळ जूनमध्येच (६ दिवस)म्हणावा असा मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे २०१५ मध्ये पावसाचे प्रमाण त्याच्या आदल्या वर्षीच्या तुलनेत घटून कुलाबा(१६०५ मिलिमीटर) आणि सांताक्रूझ (१८२३ मिलिमीटर) पर्यत खाली आले होते. २०१६ नंतर मात्र पुन्हा या मुसळधार पावसाच्या दिवसांचा चढता क्रम वाढत गेला. २०१७ मध्ये पावसाचे प्रमाण कुलाबा (२२५३ मिलिमीटर) आणि सांताक्रूझ (२९४६) पर्यंत वर गेले. परंतु या वर्षी मात्र पुन्हा हा क्रम घसरला आहे. या वर्षी मुसळधार पावसाचे दिवस घटले असून सप्टेंबपर्यंत कुलाबा येथे १७७९ मिलिमीटर आणि सांताक्रूझ येथे २२४० मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

२०१४ पासून सप्टेंबर महिन्यामध्ये सर्वात जास्त पावसाची नोंददेखील २०१६ आणि २०१७ साली अनुक्रमे १४२.२ मिलिमीटर आणि ३०३.७ मिलिमीटर केली गेली.

मान्सून माघारी जाण्यास सुरुवात

देशातून नैऋत्य मोसमी पाऊस माघारी जाण्यास सुरुवात झाली आहे. राजस्थान, गुजरातमधील कच्छ आणि अरबी समुद्राच्या काही भागातून मोसमी पाऊस शनिवारी परतला आहे. देशात केरळमधून मान्सून दाखल होतो, तर राजस्थानमधून परतण्यास सुरुवात होते. मान्सूनचे आगमन आणि त्याचा परतीचा प्रवास याबाबत मागच्या काही वर्षांमध्ये बदल होत आहे. गेल्या काही वर्षांपासून परतीच्या मान्सूनचा प्रवास उशिराने सुरू होत आहे. याही वर्षी नियोजित वेळेपेक्षा हा प्रवास उशिरानेच सुरू झाल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 30, 2018 1:15 am

Web Title: monsoon in mumbai 7
Next Stories
1 ‘पेन’च्या कविसंमेलनात माणूसपणाचा जागर
2 दक्षिण मध्य महाराष्ट्रात आज वादळी पावसाची शक्यता
3 गिरीश महाजनांच्या कालवा फुटीच्या विधानावरुन राष्ट्रवादीचा हल्लाबोल; पुण्यात फ्लेक्सबाजी
Just Now!
X