प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांनाही करोना विषाणूची लागण होण्याची भीती निर्माण झाली असून अमेरिके तील न्यूयॉर्क शहरातील ‘ ब्राँक्स’ प्राणिसंग्रहालयात चार वर्षांच्या वाघिणीला विषाणूची लागण झाल्याचे उघड झाले. यानंतर  केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरण आणि राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाने देशातील सर्व प्राणिसंग्रहालय तसेच बचाव केंद्र आणि व्याघ्रप्रकल्पांना सावधानतेचा इशारा दिला आहे.

करोनाचा विषाणू जठर आणि आतडय़ांना अधिक प्रभावित करतो. त्यामुळे राज्याच्या पशुवैद्यक विभागाची सल्लामसलत करण्यात यावी. मध्यप्रदेशातील भोपाळ शहरात असलेल्या नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ हाय सिक्युरिटी अ‍ॅनिमल डिसिज, हरियाणातील हिसार येथे असलेल्या नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स तसेच उत्तर प्रदेशातील बरेली येथे असलेल्या सेंटर फॉर अ‍ॅनिमल डिसिज रिसर्च अँड डायग्नोस्टीक, इंडियन वेटर्नरी रिसर्च इन्स्टिटय़ूट या मान्यताप्राप्त संस्था असून याठिकाणी चाचणीसाठी या संस्थांमध्ये नमुने पाठवण्यात यावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत.

मुंबईतील जिजामाता प्राणी संग्रहालयात आधीपासूनच खबरदारी घेतली जात आहे.

आदेश काय?

* प्राणिसंग्रहालयातील प्राण्यांवर २४ तास सीसीटीव्ही कॅ मेऱ्याच्या माध्यमातून नजर ठेवली जावी. सस्तन प्राण्यांवरील निरीक्षण अधिक सूक्ष्मपणे करावे.

* प्राणिसंग्रहालयातील सर्व कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी संबंधित सरकारी आरोग्य यंत्रणेकडून करून घ्यावी.

* कॅमेरा ट्रॅपच्या माध्यमातून व शक्य त्या सर्व ठिकाणी निरीक्षणातून वाघांच्या श्वसनक्रि येत अडथळा, खोकला आदींची पाहणी करावी, असे आदेश देण्यात आले आहेत.

कारण काय?

भारतातील जंगलात दोन हजार ९६७ वाघ आहेत. केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाची मान्यता असणारे १४७ प्राणिसंग्रहालय भारतात असून त्यापैकी तेरा १३ प्राणिसंग्रहालय तसेच बचाव केंद्र राज्यात आहेत. भारतातील या प्राणिसंग्रहालयात सुमारे ४०० वाघ आहेत. न्यूयॉर्कमधील वाघिणीला बाधा झाल्यामुळे भारतातही  खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.