काँग्रेसने व राज्यातील नेत्यांनी नारायण राणेंना भरभरून दिलं. त्यांना पक्षात सन्मानाने घेतलं होतं. पण त्यांनी नेहमी पक्षाविरोधात भूमिका घेतली, नेत्यांवर जाहीररित्या टीका केली. राजकारणात मार्गक्रमण करताना धीरगंभीरपणा व सबुरी आवश्यक असतं. नेहमीच पक्षाविरोधात बोलल्यानंतर कसं होणार, असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व खासदार हुसेन दलवाई यांनी उपस्थित केला.

नारायण राणेंनी काँग्रेस सोडल्याची घोषणा केल्यानंतर ‘एबीपी माझा’ या वाहिनीशी बोलताना दलवाई यांनी ही प्रतिक्रिया दिली. काँग्रेसने राणेंना भरपूर दिलं. पण आता पक्ष सोडल्यानंतर टीका करणे हे साहजिकच असल्याचे ते म्हणाले.

त्यांनी पक्ष सोडू नये म्हणून व्यक्तीश: मी त्यांना अनेकवेळा याबाबत बोललो. परंतु, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. भाजपमध्ये त्यांनी जाऊ नये. त्यांच्या पक्षात फक्त संघातून आलेल्यांनाच महत्व दिलं जातं, हे मी त्यांना सांगितल्याचे त्यांनी म्हटले.

पक्षविरोधात भूमिका घेतल्यानंतरही अशोक चव्हाणांनी त्यांना सन्मानाने मंत्रिमंडळात चांगले पद दिले. तरीही त्यांनी अशी भूमिका घेणे योग्य नाही. आता राणेंनी पक्ष सोडला आहे. त्यामुळे आमच्याकडून त्यांच्यावर आता टीका केली जाणार नाही, असेही ते म्हणाले.