मुंबई महापलिकेतील शिवसेना-भाजपमधील वाद शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. दसऱ्याच्या दिवशी भाजप कार्यकर्त्यांना चोप दिल्याप्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. खासदार किरीट सोमय्या यांनी मला जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची तक्रारी मुंबई पोलिसांत केली आहे. मुंबई महापालिकेत दरवर्षी पाच ते सहा हजार कोटींचा भ्रष्टाचार होतो. तो भ्रष्टाचार दडपून टाकण्यासाठी व महापालिकेतील माफियांच्या बॉसला वाचवण्यासाठी मला जिवे मारण्याचा कट रचण्यात आल्याची लेखी तक्रार किरीट सोमय्या यांनी मुंबई पोलीस आयुक्तांकडे केली आहे.
मंगळवारी दसऱ्याच्या दिवशी मुलुंड येथे किरीट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपने महापालिकेतील भ्रष्टाचाराच्या रावणाचे दहन करण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसैनिकांनी या कार्यक्रमात धुडगूस घालत भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली होती. त्याच दिवशी आपल्या मारून टाकण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप सोमय्यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यादिवशी मी गाडीत बसण्यासाठी गेलो असता शंभर लोकांचा जमाव माझ्यावर चालून आला. त्यांचा मला मारून टाकण्याचा उद्देश होता. पोलीस तिथे असल्याने माझा जीव वाचल्याचे तक्रारीत म्हटले आहे.

सोमय्या यांनी तक्रारीत शिवसेनेचा उल्लेख केलेला नाही. तक्रारीच्या तपशीलावरून त्यांनी शिवसेनेवरच आरोप केल्याचे स्पष्ट होते. दरम्यान भाजपच्या कार्यकर्त्यांना मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्यांची संख्या १३ इतकी झाली आहे. बुधवारी ५ शिवसैनिकांना अटक करण्यात आली होती. तर रात्री उशिरा आणखी आठ जणांना अटक करण्यात आली.