विद्यार्थ्यांची पळवापळव, धमक्यांच्या तक्रारी अशा वादग्रस्त वातावरणाची पाश्र्वभूमी लाभलेल्या मुंबई विद्यापीठातील विद्यार्थी परिषदेच्या निवडणुका बुधवारी पार पडल्या. यामध्ये मनविसेची उमेदवार रेश्मा पाटील हिने नऊ मते मिळवित एनएसयूआयच्या स्वामी नंदिनी हिचा पराभव केला. यामुळे मनविसेने यंदा पुन्हा एकदा आपला झेंडा फडकविला आहे. सचिवपदी मनविसेच्या पियुष झेंडे याने नऊ मते मिळविली आणि एनएसयूआच्या प्रणव भट याला पराभूत केले.
वादाच्या भोवऱ्यात सापडलेली ही निवडणूक बुधवारीही चमत्कारिक रित्या पार पडली. काही दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या मतांसाठी आपल्यावर राजकीय दबाव आणि जीवे मारण्याची धमकी देण्यात येत असल्याचा आरोप करीत या निवडणुकीवर बहिष्कार घालणाऱ्या तीन विद्यार्थिनींनी बुधवारच्या निवडणुकीत मतदान करीत सर्वानाच धक्का दिला. या निवडणुकांमधून युवा सेनेने माघार घेतल्याने ही लढत थेट मनविसे आणि एनएसयूआयमध्ये झाली.
बुधवारी पार पडलेल्या या मतदानात एकूण १४ सदस्यांनी मतदान केले. निवडणूक अधिकारी म्हणून विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास केंद्राचे संचालक डॉ. मृदुल निळे यांनी काम पाहिले.
नवनियुक्त विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन विद्यार्थ्यांच्या दृष्टीने काही चांगले काम करावे यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे डॉ. निळे यांनी स्पष्ट केले.