नाव मारिया, वय अवघे १०, इयत्ता पाचवी..पण या कोवळ्या वयात या चिमुकलीने शुक्रवारी प्रसंगावधान दाखवून अतुलनीय धाडस दाखविल्याने तिची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका झाली. डोंगरीत शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.
मारिया कुरेशी डोंगरी येथील नौरोजी हिल परिसरातील रस्ता क्रमांक १ वर राहते. ती माझगावच्या एका शाळेत शिकते. एका ठरलेल्या व्हॅनमधून दररोज सकाळी ती शाळेत जाते. शुक्रवारी सकाळी ७ वाजता नेहमीप्रमाणे ती आपल्या घराजवळील गुडलक मोटार ट्रेनिंगसमोर आपल्या व्हॅनची वाट बघत थांबली होती. त्या वेळी एक लाल रंगाची व्हॅन तिच्याजवळ आली. त्या व्हॅनच्या चालकाने आज तुझी नेहमीची व्हॅन येणार नाही, मी तुला शाळेत घेऊन जाणार आहे, असे सांगत आत बसायला सांगितले. मारिया त्या व्हॅनमध्ये बसली खरी, पण नेहमीची मैत्रीण न दिसल्याने तिला संशय आला. पण त्या व्हॅनमधील चालक राजा ऊर्फ मेहबूब खान (४०) याने व्हॅन दुसऱ्या रस्त्याने वळवली. सुदैवाने तेवढय़ात मारियाला तिची नेहमीची व्हॅन दिसली आणि तिला गडबड असल्याची पक्की खात्री पटली. पण मारिया प्रसंगावधान दाखवत शांत राहिली. पुढे भेंडीबाजार येथे व्हॅनचा वेग कमी होताच तिने पटकन व्हॅनचा दरवाजा उघडून धावत्या व्हॅनमधून उडी टाकली. ते पाहताच परिसरातील लोक जमा झाले आणि त्यांनी तिला उपचारासाठी जे.जे. रुग्णालयात दाखल केले. काही जणांनी त्या व्हॅनचा पाठलाग करण्याचाही प्रयत्न केला.
डोंगरी पोलिसांनी या व्हॅनला पकडण्यासाठी शहरात एम. व्ही. सीझर लावून नाकाबंदी केली. दरम्यान, पकडले जाण्याच्या भीतीने राजाने चेंबूरजवळ एका सिग्नलवर गाडी सोडून पळ काढला. पोलिसांनी ही व्हॅन ताब्यात घेऊन कागदपत्रांची तपासणी केली असता ती नूरबाग येथील एका महिलेच्या मालकीची असल्याचे आढळले. तिच्याकडून राजा खान गेल्या काही महिन्यांपासून ती भाडय़ाने चालवत होता. तिच्या माध्यमातून पोलिसांनी सापळा लावून दुपारी १ वाजता खानला नूरबाग येथे अटक केल्याची माहिती अतिरिक्त पोलीस आयुक्त कृष्णप्रकाश यांनी दिली. पोलिसांनी त्याच्यावर अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.
व्हॅनमधून उडी मारताना मारियाचा हात फ्रॅक्चर झाला आहे. मारियाचे वडील व्यवसायाने बिल्डर आहेत.