खड्डय़ांवरून तापलेले वातावरण आणि थेट नगरसेवकांच्या अटकेपर्यंत गेलेल्या घटना या पाश्र्वभूमीवर महानगरपालिकेतील अभियंता व कर्मचारी पुन्हा एकदा खड्डे भरण्याच्या कामाला लागले आहेत. तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने सुट्टीच्या दिवशी व रात्रीही अनेक भागांत खड्डे बुजवले जात आहेत. मात्र पावसाच्या सरींनी भरावातील खडी पुन्हा बाहेर पडत असल्याने कर्मचाऱ्यांनी पावसाचाच धसका घेतला आहे.

शहरातील जवळपास सर्वच रस्त्यांवर खड्डे असूनही महानगरपालिका मात्र शहरात ३५ खड्डेच शिल्लक असल्याचे सांगत राहिल्याने गेले दोन आठवडे स्थायी समितीच्या बैठकीत मोठा भडका उडाला होता. त्यातच मनसे नगरसेवक संदीप देशपांडे व संतोष धुरी यांनी मुख्य अभियंत्याच्या हाती ‘खड्डय़ांसाठी जबाबदार’ असल्याची पाटी देत खड्डय़ात उभे केल्याने अभियंत्यांनी आंदोलन पुकारले व दोन्ही नगरसेवकांना शनिवारी रात्री अटक करून सोमवापर्यंतची न्यायालयीन कोठडी  देण्यात आली. खड्डे बुजवण्याचे आश्वासन मिळेपर्यंत जामीन घेणार नसल्याचे नगरसेवकांनी स्पष्ट केल्यानंतर या प्रकरणी अधिक राजकारण होऊ नये, यासाठी महानगरपालिकेने युद्धस्तरावर खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले आहे.

तीन दिवस पावसाने उघडीप दिल्याने रस्ते सुकले असून खड्डे बुजवण्याचे काम प्रत्येक प्रभागात सुरू आहे. सुट्टीच्या दिवशी तसेच रात्रीही अनेक ठिकाणचे खड्डे बुजवले जात आहेत. शनिवारी रात्री तब्बल २४० टन मिश्रण कारखान्यातून पाठवण्यात आले आहे. येत्या तीन दिवसांत सर्व खड्डे बुजवले जाऊ शकतात, असे रस्ते विभागातील एका अभियंत्याने सांगितले. मात्र पावसामुळे खडी पुन्हा उकरली जात असल्याने पाऊस पडल्यास पुन्हा खड्डे पडतील, अशी भीतीही त्याने व्यक्त केली. दरम्यान सोमवारी मनसेचे पदाधिकारी साहाय्यक आयुक्तांची भेट घेणार आहेत.