जीर्ण झाल्याने अवजड वाहने, पादचाऱ्यांना मज्जाव

लोअर परळ स्थानकाजवळील उड्डाणपूल बंद केल्यानंतर दक्षिण मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा उड्डाणपूल बंद होणार आहे. ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील ब्रिटीशकालीन उड्डाणपूलाची रेल्वेने पाहणी केली असून त्याची पुनर्बाधणी करण्यात येणार आहे. हा पूल जीर्ण झाल्याने तूर्तास पादचाऱ्यांबरोबरच अवजड वाहनांसाठी बंद राहणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेने दिली. लोअर परळपाठोपाठ दक्षिण मुंबईतील आणखी एक महत्त्वाचा पूल बंद होणार असल्याने या परिसरात मोठय़ा वाहतुक कोंडीला सामोरे जावे लागणार आहे.

३ जुलै २०१८मध्ये अंधेरीतील गोखले उड्डाणपुलाची पादचारी मार्गिका कोसळून अपघात झाल्यानंतर रेल्वे मार्गावरून जाणाऱ्या पुलांचा प्रश्न ऐरणीवर आला. या अपघातानंतर रेल्वे, महापालिका यांनी आयआयटी, व्हीजेटीआय आदी अभियांत्रिकी शिक्षणसंस्थांमधील तज्ज्ञांच्या मदतीने उड्डाणपुलांची सुरक्षा तपासणी सुरू केली. त्यात लोअर परळमधील डिलाइल रोडचा उड्डाणपूल धोकादायक आढळून आला. त्यामुळे तो जुलै २०१८ मध्ये वाहतूक व पादचाऱ्यांसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला. त्यात आता ग्रॅण्ट रोड स्थानकाजवळील पूलही धोकादायक आढळून आल्याने टप्प्याटप्प्याने वाहतुकीसाठी बंद करून, पाडून पुन्हा बांधण्याचा रेल्वेचा विचार आहे.

गॅ्रण्ट रोड रेल्वे स्थानकाजवळील मौलाना शौकत अली रोडवरील फ्रेरे पूल कालांतराने सर्वच वाहनांसाठी पूल बंद करण्यात येणार असल्याचे पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी रवींद्र भाकर यांनी सांगितले. पुलावरील दोन्ही बाजूवरील पादचारी मार्गिकाही बंद करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

९८ वर्षांचा पूल

ग्रॅण्ट  रोड स्थानकातील मौलाना शौकत अली रोडवरील उड्डाणपूल (फ्रेरे पूल) हा १९२१ साली बांधण्यात आला. पूर्व-पश्चिम असा जोडणाऱ्या पुलावरून लेमिंग्टन रोड, चर्नी रोड, नाना चौक, मरीन लाइन्सच्या दिशेने जाण्यासाठी मोठय़ा प्रमाणात वाहनांची वर्दळ होत असते.