पिशव्या जमा करण्यासाठी बसवलेल्या पेटय़ांकडे दुर्लक्ष

मुंबई : अधिसूचना जारी झाल्यानंतर तीन महिन्यांनी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्याचे न्यायालयाने दिलेले आदेश आणि पालिकेने प्लास्टिकच्या पातळ पिशव्यांविरुद्ध बंद केलेली दंडात्मक कारवाई यामुळे दुकानदारांनी आपल्याकडील प्लास्टिकच्या पिशव्या ग्राहकांना देऊन संपवण्याचा सपाटा लावला आहे. तर दुसरीकडे नागरिकांकडील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करण्यासाठी मंडया आणि सार्वजनिक ठिकाणी उपलब्ध केलेल्या पेटय़ांना फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. महिना होत आला तरी या पेटय़ांमध्ये केवळ सव्वा टन प्लास्टिकच्या पिशव्या गोळा झाल्या आहेत. पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा मोह नागरिकांना अद्याप सुटत नसल्याचे यावरून दिसून येत आहे.

राज्य सरकारने प्लास्टिक बंदीची अधिसूचना जारी केल्यानंतर बाजारपेठा, मंडयांमधील फेरीवाल्यांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळण्यास सुरुवात केली होती. दंडात्मक कारवाईच्या भीतीपोटी अनेक फळ-भाजी विक्रेते खरेदीदारांना सोबत कापडी पिशवी घेऊन येण्याचा आग्रह करीत होते. कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्याला आपल्याकडील वस्तूंची विक्री न करण्याचा निर्णय काही विक्रेत्यांनी घेतलाही होता. त्यामुळे हळूहळू बाजारपेठांमधून प्लास्टिकच्या पिशव्या हद्दपार होत असल्याचे आणि ग्राहक कापडी पिशवी घेऊन बाजारात येत असल्याचे चित्र दिसत होते. मात्र हे दृश्य काही काळच टिकले.

राज्य सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर तीन महिने आपल्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांची विल्हेवाट लावण्यासाठी न्यायालयाने मुदत दिली आहे. राज्य सरकारने अधिसूचना जारी केल्यानंतर म्हणजे २३ जून रोजी प्लास्टिक बंदीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणावर प्लास्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या आहेत. दुकानदारांनी पूर्वी बेगमी करून ठेवलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या पुन्हा एकदा बाहेर काढल्या असून कापडी पिशवी घेऊन न येणाऱ्या ग्राहकांना प्लास्टिकच्या पिशव्या देऊन त्या संपविण्याचा सपाटा दुकानदारांनी लावला आहे. त्यामुळे बाजारपेठांमध्ये ग्राहकांच्या हाती पुन्हा प्लास्टिकच्या पिशव्या दिसू लागल्या आहेत.

उत्पादकांना आपल्याकडील प्लास्टिकच्या पिशव्यांच्या साठय़ाची विल्हेवाट लावावी लागणार आहे. त्यासाठी ही मंडळी परराज्यातील उत्पादकांशी संपर्क साधत आहेत. नागरिकांकडून प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करण्यासाठी पालिकेने आपल्या मंडया, विभाग कार्यालये आणि काही सार्वजनिक ठिकाणी पेटय़ा उपलब्ध केल्या असून या पेटय़ांमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या टाकण्याचे आवाहन पालिकेने नागरिकांना केले आहे. मात्र पेटय़ा उपलब्ध करून महिना होत आला तरी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळू शकलेला नाही. आतापर्यंत पालिकेच्या पेटय़ांमध्ये जेमतेम सव्वा टन प्लास्टिकच्या पिशव्या जमा झाल्या आहेत. त्यामुळे घराघरांतील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करण्याचे मोठे आव्हान पालिकेसमोर आहे.

दंडात्मक कारवाई बंद

२६ जुलै २००५च्या पावसानंतर पालिकेने मुंबईमध्ये ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या पिशव्यांवर बंदी घातली आणि कारवाईचा बडगा उगारण्यास सुरुवात केली, परंतु अल्पावधीतच पालिकेची कारवाई थंडावली. आणि मुंबईत सर्रास कमी जाडीच्या प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर सुरू झाला. राज्य सरकारने प्लास्टिक बंदीचा आदेश जारी केल्यानंतर पालिकेने कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांविरुद्ध धडक कारवाई सुरू केली. त्यामुळे दुकानदार आणि फेरीवाल्यांनी धसका घेऊन प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळणे पसंत केले होते. मात्र आता न्यायालयाने २३ जूनपर्यंत प्लास्टिक पिशव्या गोळा करण्यासाठी मुदत दिल्यानंतर पालिकेने दंडात्मक कारवाई पूर्णपणे थांबविली आहे.

नागरिकांच्या घरातील प्लास्टिकच्या पिशव्या गोळा करण्यासाठी मंडया, विभाग कार्यालयांमध्ये पेटय़ा उपलब्ध केल्या आहेत. प्रदूषणास घातक असलेल्या प्लास्टिकच्या पिशव्या नागरिकांनी या पेटय़ांमध्ये जमा कराव्यात, असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे. आता त्यासाठी जनजागृतीही करण्याचा पालिकेचा मानस आहे.

– विश्वास शंकरवार, उपायुक्त, घनकचरा व्यवस्थापन