नालेसफाई करणारे कंत्राटदार आणि पालिका आधिकारी संगनमताने काम करीत असल्यामुळे पालिकेचे नुकसान होत आहे. पालिकेचे नुकसान करणाऱ्या अधिकाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करा, अशी मागणी मुंबई प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष जनार्दन चांदुरकर यांनी शुक्रवारी पालिका आयुक्तांकडे केली. पावसाळा तोंडावर आल्यामुळे पालिकेच्या कामांचा आढावा घेण्यासाठी जनार्दन चांदुरकर यांनी आमदार, नगरसेवकांसमवेत पालिका मुख्यालयात आयुक्त सीताराम कुंटे यांची भेट घेतली.
नालेसफाई करणाऱ्या केवळ एल विभागातील कंत्राटदाराव्यतिरिक्त अन्य कोणत्याही कंत्राटदाराला गाळ टाकण्यासाठी खासगी जमीन मालकाकडून ‘ना हरकत’ प्रमाणपत्र मिळविता आलेले नाही, असाही आरोप चांदोलकर यांनी यावेळी केला. ही बाब आपण आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली असून संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करावी, अशी मागणी केल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले. साथीच्या आजारांचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी उपाययोजना, अनधिकृत झोपडपट्टय़ांवर कारवाई, वृक्ष छाटणी आदी विषयांवरही त्यांनी आयुक्तांशी चर्चा केली.