देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईतील स्थिती करोनामुळे गंभीर बनली आहे. दिवसाला दहा हजारांच्या सरासरीने रुग्ण आढळून येत असल्यानं बेड मिळवताना रुग्णांच्या नातेवाईकांची दमछाक होत आहे. अनेकजण बेड अडवून ठेवत असल्याचंही महापालिकेच्या पाहणीतून समोर आलं असून, आता सर्वसामान्य रुग्णांना बेड मिळवून देण्यासाठी कठोर कार्य पद्धती मुंबई महापालिकेकडून अवलंबली जाणार आहे. महापौर किशोर पेडणेकर यांनी याबद्दलची माहिती दिली.

मुंबईत करोना रुग्णांना बेड मिळत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. त्यामुळे महापालिकेकडून कृती कार्यक्रम तयार केला जात असून, याबद्दलची माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली. त्या पत्रकारांशी बोलत होत्या. महापौर म्हणाल्या, “मुंबईतील कोविड रुग्णांना योग्य बेड मिळण्यासाठी महापालिकेनं कठोर पावलं उचलली आहेत. कठोर कार्य पद्धती अमलात आणली जाणार आहे. आता प्रत्येक वार्डसाठी दोन नोडल अधिकारी असतील. हे अधिकारी दुपारी ३ ते रात्री ११ आणि रात्री ११ ते ७ या वेळेत ते काम पाहणार आहे. त्यामुळे सायंकाळी ७ वाजेपासून ते सकाळी ७ वाजेपर्यंत रुग्णांना बेडसाठी जी वणवण करावी लागते. योग्य व्यक्तींकडून मार्गदर्शन मिळतं नाही. १९१६ वर कॉल करतात. मात्र, अनेकांना फोन व्यस्त सांगतो, त्यामुळे मुंबईकरांनी प्रत्येक वॉर्डमधील वॉररुममध्येच फोन करावा. जेणेकरून वॉररुम आणि नोडल अधिकारी बेड मिळवून देण्यासाठी मदत करतील,” असं आवाहन महापौर किशोरी पेडणेकर यांनी केलं आहे.

“२४ तासांच्या आत रिपोर्ट देण्याचे महापालिकेनं प्रयोगशाळांना सांगितलं आहे. जेणेकरून लगेच त्यांच्यावर औषधोपचार करता येतील. तसंच त्यांना पुढील उपचारासाठी कुठे पाठवायचं, याचीही वर्गवारी करण्यास मदत होईल. महापालिकेनं हॉटेल्सची मदत घेतली आहे. त्या हॉटेल्समध्ये कोविड सेंटरसारखेच प्रशिक्षित डॉक्टर आणि इतर सुविधा असतील. अशा हॉटेल्समध्ये बरं झाले आहेत, तरीही खासगी बेड अडवून ठेवलेले आहेत. त्यांच्यासाठी ही व्यवस्था आहे. ज्यांना जिथं राहणं परवडेल, त्यांनी तिथं राहावं अशी व्यवस्थाही केलेली आहे. बेड अडवून ठेवल्यामुळे गरज असलेल्या रुग्णांना बेड उपलब्ध होत नाहीत,” असं महापौर म्हणाल्या.

“महापालिकेनं ३२५ अतिरिक्त आयसीयू बेड रुग्णालयांना जोडण्यात आले आहेत. त्यामुळे मुंबईतील एकूण आयसीयू बेड्सची संख्या २ हजार ४६६ वर गेली आहे. पुढील सात दिवसांत ११०० अतिरिक्त कोविड केअर सेंटर आणि १२५ आयसीयूसह सुरू करण्यात येणार आहे. रुग्णालयांची संख्या वाढवण्यात आलेली असली, तरी मुंबईकरांनी स्वतःला जपावं. कारण हे संकट गडद होत चाललं आहे,” असं आवाहन महापौर पेडणेकर यांनी केलं आहे.