अपुरे मनुष्यबळ, आपत्कालीन कामासाठी निधीची चणचण, आवश्यक साहित्याचा तुटवडा, वर्षांनुवर्षे न भरलेली रिक्त पदे आदी विविध कारणांमुळे मुंबईमधील विद्युतदाहिनी आणि स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण पडत आहे. प्रलंबित मागण्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे अखेर आता या कर्मचाऱ्यांनी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला असून त्यामुळे स्मशानभूमींमधील व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे आहेत.
मुंबईमध्ये एकूण १९७ पैकी ६१ स्मशानभूमी पालिकेच्या अखत्यारीत असून ११ ठिकाणी विद्युतदाहिन्याही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या अखत्यारीतील बहुतांश स्मशानभूमी आणि विद्युतदाहिन्यांची अवस्था दयनीय बनली आहे. बहुतांश विद्युतदाहिन्या बंद असल्यामुळे अंत्यसंस्कारासाठी स्मशानभूमीमध्ये जावे लागत आहे. या स्मशानभूमीमध्ये तीन पाळ्यांमध्ये काम चालत असून विविध श्रेणीची एकूण सुमारे एक हजार पदे आहेत. मात्र त्यापैकी तब्बल २०० हून अधिक पदे आजघडीला रिक्त आहेत. वेळोवेळी रिक्त पदे भरण्यात न आल्याने सध्या स्माशानभूमीत कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण येत असून काही कर्मचाऱ्यांना दोन-दोन दिवस कामावरच थांबावे लागते. त्याचबरोबर आपत्कालीन कामासाठी निधी, तसेच आवश्यक ते साहित्य मिळत नसल्याने कर्मचारी हैराण झाले आहेत. तसेच स्मशानभूमींची दुरुस्तीही रखडली असून अंत्यसंस्कारासाठी येणाऱ्या नागरिकांचे बोल या कर्मचाऱ्यांना ऐकावे लागत आहेत. अशा एक ना अनेक समस्यांनी कर्मचारी त्रस्त असताना या कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळांमध्ये बदल करण्यात आले, तसेच गेली अनेक वर्षे त्यांना पदोन्नतीपासून वंचित ठेवण्यात आले आहे. यामुळे स्मशानभूमीतील कर्मचाऱ्यांचा भडका उडाला आहे.
म्युनिसिपल मजदूर युनियनने अनेक वेळा या कर्मचाऱ्यांच्या मागण्या प्रशासनाच्या दरबारी पोहोचविल्या. ऑगस्ट २०१५ पर्यंत या मागण्यांची पूर्तता करण्याचे आश्वासन प्रशासनाकडून देण्यात आले होते. मात्र आता सप्टेंबर संपत आला तरी स्मशानभूमींची अवस्था ‘जैसे थे’च आहे. नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणून कर्मचाऱ्यांना स्मशानभूमी सोडून घरीही जाता येत नाही. प्रशासन स्मशानभूमीतील व्यवस्था आणि मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांनी २ ऑक्टोबरपासून बेमुदत उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीला प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा युनियनचे सरचिटणीस अ‍ॅड. महाबळ शेट्टी यांनी दिला आहे. या कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे मुंबईमध्ये नवी समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.