एका खासगी कंपनीच्या आवारात खेळणाऱ्या दोन महिन्यांच्या मांजराच्या पिल्लाला कंपनीतील शिपायाने बांबूने ठार मारल्याची धक्कादायक घटना सांताक्रूझ येथे घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिरंगाई केल्यामुळे घटना घडल्याच्या वीस दिवसांनंतर गुन्हा नोंदविण्यात आला आणि त्यानंतर संबंधित शिपायाला अटक झाली. न्यायालयाने जामीन मंजूर केल्यामुळे या शिपायाची मुक्तता झाली

सांताक्रूझ येथील रहेजा महाविद्यालयाजवळील रिलिफ मार्गावर एका कंपनीत काम करणाऱ्या युवराज भावसार हे काम करतात. मांजरांची आवड असल्याने त्यांच्या कार्यालयाच्या परिसरात मांजरांची अनेक पिल्ले बागडत असतात. भावसार दररोज या मांजरांना दूधही देतात. ६ मे रोजी दुपारी जेवणासाठी भावसार हे बाहेर जात होते. त्या वेळी तीन मांजरी त्यांच्या कार्यालयासमोर बसल्या होत्या. मात्र जेवून आल्यानंतर या तिघांपैकी एक मांजर मृतावस्थेत आढळली. हे पाहताच त्यांनी तात्काळ सांताक्रूझ पोलीस ठाण्यात धाव घेतली. भावसार यांनी पोलिसांना त्यांच्या कार्यालयासमोरील केस्मा इम्पेक्स प्रा. लि. कंपनीचा सीसीटीव्ही तपासण्याची मागणी केली. या तपासणीत केस्मा कंपनीचा शिपाई मनोज आंगणे (३१) या दोन महिन्यांच्या मांजरीला बांबूने मारहाण करीत असल्याचे स्पष्ट झाले. यावर भावसार यांनी शिपायावर गुन्हा नोंदविण्याची मागणी केली. मात्र पोलीस गुन्हा नोंदविण्यास तयार नव्हते, असा दावा भावसार यांनी केला आहे. अखेर २५ मे रोजी ‘पेटा’ या प्राणी संघटनेच्या प्रतिनिधीने पोलीस आयुक्तांना पत्र पाठविल्यानंतर २६ मे रोजी या कंपनीचा शिपाई मनोज आंगणे याच्याविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला. मात्र त्यानंतर न्यायालयाने त्याची जामिनावर सुटका केली.

यापूर्वीही तीन वेळा कार्यालय परिसरातील तीन मांजरांना मारण्यात आले आहे. यातील एका मांजराचा पायच तोडण्यात आला होता, तर दुसऱ्या मांजराच्या पाण्यात फिनाइल टाकण्यात आले होते, तर तिसरी मांजर आजतागायत मिळाली नाही, असे भावसार यांचे म्हणणे आहे. याबाबत त्यांना मनोज आंगणे यांच्यावर शंका आहे. त्यामुळे भावसार यांनी आरोपी मनोज आंगणे यांना कामावरून कमी करण्याची मागणी केस्मा कंपनीच्या मालकाकडे केली आहे. मात्र या प्रकरणात केस्मा कंपनी मनोज आंगणे यांना कामावरून काढण्यास नकार देत आहे, असे ‘पेटा’ संघटनेचे प्रतिनिधी मीत असर यांनी सांगितले.