हत्येची माहिती असलेला मित्र साक्षीदार होणार

नागपाडय़ातील साडेतीन वर्षांच्या चिमुरडीची खंडणीसाठी अपहरणानंतर हत्या करणाऱ्या अल्पवयीन तरुणांविरोधात जे. जे. मार्ग पोलिसांच्या हाती भक्कम पुरावा लागला आहे. या प्रकरणाची माहिती असलेला साक्षीदारच पोलिसांनी शोधला आहे. हा साक्षीदार आरोपींचा मित्र असून त्याच्याकडे दोघांनी गुन्ह्य़ाची कबुली दिली होती.

एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतरच्या तपासात त्यांनी चिमुरडीच्या हत्येची माहिती आपल्या एका मित्राला दिली होती, ही बाब पुढे आली. जे.जे. मार्ग पोलिसांनी या मित्राला शोधून काढले. गेल्या काही दिवसांपासून त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत होते. मात्र या मुलाला हत्याकांडाची निव्वळ माहिती होती, पण गुन्ह्यत सहभाग नव्हता हे स्पष्ट होताच वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानुसार त्याला साक्षीदार करण्यात आले. या मुलाचा सविस्तर जबाब पोलिसांनी नोंदवून घेतला आहे.

काझीवाडय़ात राहणारी जुनेरा खान ही साडेतीन वर्षांची चिमुरडी बेपत्ता झाली होती. १९ डिसेंबर रोजी आरोपींनी चिमुरडीच्या वडिलांना खंडणीसाठी धमकावले. त्यानंतर याच परिसरात एका इमारतीच्या गच्चीवर तिचा मृतदेह सापडला होता.