News Flash

धावत्या रेल्वेत अग्नितांडव ;९ मृत्युमुखी

बंगलोर-नांदेड एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातील अग्नितांडवात २६ प्रवाशांचा मृत्यू होण्याची दुर्घटना ताजी असतानाच असाच प्रकार बुधवारी पहाटे घोलवड स्थानकानजीक घडला.

| January 9, 2014 02:36 am

बंगलोर-नांदेड एक्स्प्रेसच्या वातानुकूलित डब्यातील अग्नितांडवात २६ प्रवाशांचा मृत्यू होण्याची दुर्घटना ताजी असतानाच असाच प्रकार बुधवारी पहाटे घोलवड स्थानकानजीक घडला. वांद्रे-डेहराडून एक्स्प्रेसच्या तीन डब्यांना लागलेल्या आगीत नऊ जणांचा मृत्यू झाला. आगीचे कारण मात्र अद्याप कळू शकले नाही.
वांद्रे येथून निघालेली एक्स्प्रेस पहाटे अडीचच्या सुमारास घोलवड स्थानकानजीक आली. त्याचवेळी एस-२ या डब्यात अचानक मोठा आवाज झाला व थोडय़ाच अवधीत डब्याने पेट घेतला. आग झपाटय़ाने पसरत एस-३ आणि एस-४ या डब्यांपर्यंत पोहोचली. घोलवडजवळ असलेल्या रेल्वेफाटकावरील कर्मचाऱ्याच्या ही बाब निदर्शनास आली. त्याने तातडीने गाडीच्या गार्डला आगीची माहिती दिली. गार्डने तातडीने इंजिनचालकाला माहिती दिली. त्यानंतर घोलवड स्थानकात गाडी थांबवण्यात आली. फाटकावरील कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे पुढील अनर्थ टळला. घोलवड स्थानकात गाडी शिरताच आग विझविण्याचे प्रयत्न सुरू झाले. मात्र, तोपर्यंत एस-२ हा डबा आगीत भस्मसात झाला होता. त्यात नऊ जणांचा करुण अंत झाला. इतरांनी तातडीने उडय़ा मारल्यामुळे त्यांचा जीव वाचला. थंडीमुळे डब्यांची दारे-खिडक्या बंद असल्याने बाहेर पडण्यास आपद्ग्रस्तांना जीव वाचवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागले. आगीत भस्मसात झालेल्या एस-२ डब्यात ५४ प्रवासी होते, एस-३ डब्यात तीन, तर एस-४ डब्यात ६४ प्रवासी होते.
चार मृतांची ओळख पटली
दरम्यान, या अपघतात मृत्युमुखी पडलेल्या नऊपैकी चार जणांची ओळख पटली आहे. या मृतदेहांचा अक्षरश: कोळसा झाला होता. डीएनए तपासणीतून चौघांची ओळख पटली. त्यात नशीरखान पठाण (रा. दाहोद, गुजरात), सुरेंद्र शहा (६८, रा. घाटकोपर), दीपिका शहा (६४, रा. घाटकोपर) आणि देवशंकर उपाध्याय (रा. बोरिवली) या चौघांचा समावेश आहे. अकील डब्बेवाला (५१), इब्राहिम बोहरा (२७), शामिलाबी डब्बेवाला (४५) आणि इब्जर डब्बेवाला (२९) हे एकाच कुटुंबातील चौघे जबर भाजले असून, त्यांच्यावर घोलवड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. इतर जखमींना गुजरातमधील वापी व हरिया या ठिकाणी हलवण्यात आले आहे.
मृतांच्या नातेवाइकांना पाच लाखांची मदत
या दुर्घटनेप्रकरणी रेल्वेमंत्री मल्लिकार्जुन खरगे यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले. मृतांच्या नातेवाइकांना पाच लाख रुपये, तर जखमींना ५० हजार रुपयांची मदत रेल्वेकडून जाहीर करण्यात आली. आगीचे कारण समजू  शकले नसले, तरी शॉर्टसर्किटमुळेच ही आग लागली असावी, असा अंदाज आहे. सुरक्षा आयुक्तांमार्फत घटनेची चौकशी करण्यात येणार आहे.
मदत पोहोचण्यात उशीर
ऐन मध्यरात्री आणि निर्मनुष्य ठिकाणी ही आग लागल्याने मदतीची कुमक मिळण्यास विलंब लागला. जनरल डब्यातून प्रवास करणाऱ्या सांताक्रूझ येथील पाच तरुणांनी जीव धोक्यात घालून पेटत्या डब्यात अडकलेले प्रवासी आणि जखमींना बाहेर काढले. प्रवासी आणि गाडीतील कर्मचाऱ्यांनी अग्निरोधक सिलिंडर्सच्या मदतीने आगीचा प्रतिकार केला. मात्र आगीच्या तीव्रतेपुढे त्यांचे प्रयत्न तोकडे ठरले. पालघरहून रेल्वे पोलीस डहाणूला पोहोचले, परंतु तेथून त्यांना घटनास्थळी चालत जावे लागले. त्यामुळे घटनेनंतर दीड तासाने मदत पोहोचली. अग्निशमन दल, पोलीस प्रशासन आणि रेल्वे सुरक्षा बलाच्या जवानांनी परिस्थिती नियंत्रणात आणून मृतदेह डहाणू महाविद्यालयात हलविले. आगीच्या भक्ष्यस्थळी गेलेले डबे काढून गाडी पुढे रवाना करण्यात आली.
घटनेसंबंधी माहितीसाठी ०२२-२३०११८५३ आणि ०२२-२३००७३८८ हे दोन हेल्पलाइन क्रमांक सुरु केले आहेत.     

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 9, 2014 2:36 am

Web Title: mumbai dehradun express catches fire near thane nine killed
टॅग : Fire
Next Stories
1 डॉक्टरला पोलिसांची मारहाण : उच्च न्यायालयाची तपास अधिकाऱ्याला ‘कारणे दाखवा’ नोटीस
2 काँग्रेसकडून भारिप,बसपकडे युतीसाठी चाचपणी
3 १४७ सिंचन प्रकल्पांना मान्यता ६०० कोटींचा वाढीव खर्च
Just Now!
X