प्रशिक्षणार्थी छायाचित्रकार तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणात अटक करण्यात आलेले सर्व आरोपी सज्ञान आहेत, असे पोलीस आयुक्त डॉ. सत्यपाल सिंग यांनी सोमवारी स्पष्ट केले. या आरोपींपैकी एक आरोपी अल्पवयीन असल्याची चर्चा दोन दिवसांपूर्वी सुरू होती. दिल्ली बलात्कार प्रकरणाप्रमाणे या प्रकरणातही या अल्पवयीन आरोपीची सुटका होणार का, असा प्रश्नही चर्चिला जात होता. मात्र अल्पवयीन मानण्यात येणारा आरोपी हा १८ वर्षांचा आहे, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.
मुंबईतील महिलांच्या सुरक्षेविषयी गंभीर प्रश्न निर्माण करणाऱ्या या घटनेनंतर मुंबई पोलिसांनी त्वरित कारवाई केली. या कारवाईत चांद बाबू सत्तार शेख या १८ वर्षांच्या तरुणालाही अटक करण्यात आली. चांद हा अल्पवयीन असल्याची चर्चा सुरू होती. मात्र पोलिसांच्या नोंदीप्रमाणे चांदला याआधीही एका चोरीच्या प्रकरणात अटक झाली होती. त्या वेळी तो अल्पवयीन होता. मात्र आता त्याने वयाची १८ वर्षे पूर्ण केली असल्याने तो अल्पवयीन ठरत नाही, असे आयुक्तांनी सांगितले.
हे पाचही आरोपी एकमेकांच्या नियमित संपर्कात होते. यापूर्वी त्यांनी एकत्रितपणे चोऱ्या केल्या होत्या, असेही सिंग म्हणाले. या पाच जणांच्या मोबाइलमधील माहिती आणि मोबाइलचा रेकॉर्ड तपासला जात आहे. तसेच पीडित तरुणीचे कोणतेही छायाचित्र आपल्याला आतापर्यंत मिळालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबई पोलीस हे सक्षम आहेत. गुन्हा करणाऱ्यांना ते शासन दिल्याखेरीज राहत नाहीत, हेच आम्ही केलेल्या तपासावरून स्पष्ट होत आहे. त्यामुळे यापुढेही गुन्हेगारांनी पोलिसांना गृहित धरू नये, असा इशारा देत सिंग यांनी स्वत:ची आणि स्वत:च्या दलाची पाठही स्वत:च थोपटून घेतली.
आता २७२ निर्जन स्थळे रडारवर!
मुंबईत शक्ती मिलच्या ओसाड आवारासारखी आणखी २७२ ठिकाणे आहेत. या स्थळांची मालकी ज्यांच्या ताब्यात आहे अशा व्यक्ती, कुटुंब किंवा कंपनी यांना या स्थळांमध्ये सुरक्षा व्यवस्था ठेवण्याबाबत सूचना दिल्या गेल्या आहेत. संबंधित मालकांनी योग्य ती काळजी न घेतल्यास कारवाई केली जाईल, असे आयुक्तांनी सांगितले. पूर्व उपनगरांमधील लाल बहादूर शास्त्री रस्त्यावरील बंद पडलेल्या अनेक गिरण्यांची आवारे, काही कंपन्यांच्या मालकीचे असलेले आणि त्यांच्या आवारातून जाणारे सुनसान रस्ते यांचा या ठिकाणांमध्ये समावेश असण्याची शक्यता आहे.