शक्ति मिल कंपाऊंडमध्ये एका छायाचित्रकार तरुणीवर बलात्कार करणाऱ्या नराधमांची आणखी कृष्णकृत्ये आता उघड होत आहेत. यातील तीन जणांनी आपल्या अन्य दोन साथीदारांसह ३१ जुलै रोजी भांडुपमधील एका तरुणीवर बलात्कार केला होता. ही वैफल्यग्रस्त तरुणी समाजात नाचक्की होण्याच्या भीतीने मुंबईबाहेर गेली होती. मात्र, सोमवारी तिने धैर्य एकवटले आणि नराधमांच्या कृत्याचा पोलिसांसमोर पाढा वाचला.
ही तरुणी आपल्या मित्रासह ३१ जुलै रोजी सायंकाळी महालक्ष्मी येथील उद्यानात फिरण्यासाठी जात होती. त्या वेळी शक्ती मिल कंपाऊंड येथे कासम बंगाली, सिराज खान व मोहम्मद सलीम अन्सारी यांनी या दोघांना हटकले. ‘येथे येण्याची परवानगी घेतली का, इथे एक हत्या झाली होती’ असे सांगत दोघांना धमकावले व चौकशीच्या बहाण्याने मिलमध्ये नेले. तेथे या तिघांनी आपल्या अन्य दोन साथीदारांना बोलावून घेतले. या पाच जणांनी तरुणीच्या मित्राला मारहाण केली व तरुणीच्या ओढणीने त्याला बांधून ठेवले. त्यानंतर पाचही जणांनी आळीपाळीने तिच्यावर मित्रासमक्ष बलात्कार केला. या वेळी मारहाणीत त्यांनी तरुणीचे कपडेही फाडून  टाकले होते. सुटका झाल्यानंतर तिच्या मित्राने तिला आपला टी शर्ट दिला आणि नंतर बाहेर जाऊन दुसरे कपडे घेतले. या अवस्थेत घरी कसे जायचे, असा प्रश्न पडल्याने त्यांनी छत्तीसगढला मित्राकडे जाण्याचा निर्णय घेतला. त्याच रात्री कोलकात्याला जाणारी गाडी पकडून ते दोघे छत्तीसगढला रवाना झाले.
इकडे मुंबईत आपली मुलगी घरी न परतल्याने आईने शोधाशोध केली. दुसऱ्या दिवशी तिने भांडुप पोलीस ठाण्यात तक्रार दिली. मात्र काही दिवसांनी मुलीने आईला फोन करून ‘आपण सुखरूप असून लवकरच घरी परतू’ असे सांगितले. मुलीच्या आईला तिच्या त्या तरुणाबरोबर असलेल्या प्रेमसंबंधांची माहिती होती.
रविवारी ही पीडित तरुणी घरी परतली आणि लग्न केल्याचे आईला सांगितले. त्याचवेळी तिने हा प्रसंगही सांगितला. बदनामीच्या भीतीपोटी या प्रकरणाची वाच्यता कुठेही न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला होता. आपली मुलगी घरी परतली, असे तिच्या आईने पोलिसांना कळवले. पण औपचारिकता म्हणून मुलीला जबाब देण्यासाठी यावे लागेल, असे पोलिसांनी सांगितले. सोमवारी रात्री भांडुप पोलीस ठाण्यात तिने अखेर जबाब दिला आणि या भयानक प्रकरणाला वाचा फुटली, असे पोलीस उपायुक्त विनायक देशमुख यांनी सांगितले.
लग्न करून त्याने खरे प्रेम सिद्ध केले
पीडित तरुणीचे मित्राबरोबर दोन वर्षांपासून प्रेमसंबंध होते. ते दोघे पूर्वी एकत्र काम करत होते तेव्हापासून त्यांची मैत्री होती. मध्यंतरी त्यांचे बिनसले होते. पण पाच महिन्यांपूर्वी ते पुन्हा एकत्र आले होते. तरुणीच्या घरी याबद्दल माहिती होती. पण मुलाला त्यांचा विरोध होता. त्यामुळे ते लपूनछपून भेटत होते. ३१ जुलैला ते असेच भेटले होते. या दिवशी तो तिला लग्नाची मागणी घालणार होता. पण दुर्देवाने तो प्रसंग ओढावला. त्याच्या डोळ्यादेखत तिच्यावर पाच गुंडांनी सामूहिक बलात्कार केला. पण या प्रसंगानंतरही त्याने तिची साथ सोडली नाही. त्याने तिला मानसिक आधार दिला आणि तिला आपल्या मित्राकडे, छत्तीसगढला घेऊन गेला. तेथे एका देवळात दोघांनी लग्न केले. खरं प्रेम म्हणतात ते हेच.
दोन घटना एक ओढणी.
२२ ऑगस्ट रोजी शक्ती मिलमध्ये छायाचित्रकार तरुणीवर पाच जणांनी सामूहिक बलात्कार केला होता. घटनेनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी त्याच जागेवर सापडलेल्या ओढणीचा वापर केला होता. या ओढणीने त्यांनी छायाचित्रकार तरुणीला घटनास्थळ स्वच्छ करण्यास सांगितले होते. ही ओढणी ३१ जुलै बलात्कार झालेल्या १९ वर्षीय तरुणीचीच होती हे आता स्पष्ट झाले आहे. या ओढणीने त्यांनी पीडित तरुणीच्या मित्राला बांधले होते. दोन्ही प्रकरणात या ओढणीचा महत्त्वाचा पुरावा म्हणून उपयोग होणार आहे, अशी माहिती वरिष्ठ पोलिसांनी दिली.
* शक्ती मिलमध्ये नराधमांनी घटनाक्रम उलगडला
* बलात्कार प्रकरणातील एक आरोपी अल्पवयीन!
* शरमिंदा महाराष्ट्र !