भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांच्या रविवारी मुंबईत होणाऱ्या सभेत शक्तीप्रदर्शनासाठी भाजपने जोरदार तयारी केली आहे. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समधील भव्य मैदानात होणाऱ्या ‘महागर्जना’ सभेसाठी मोदी यांचे आगमन एकच्या सुमारास होणार असून आगळ्यावेगळ्या पध्दतीने स्वागत केले जाणार आहे. भाजपने स्वबळावर घेतलेली विक्रमी गर्दीची ही सभा ठरविण्यासाठी सर्व नेते जंग जंग पछाडत आहेत.
आय.बी., एनएसजी, मुंबई पोलिस, गुजरात पोलिस आदींच्या देखरेखीखाली हजारो पोलिस कर्मचारी सभेसाठी तैनात करण्यात आले आहेत. शेकडो सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले आहेत. सुप्रसिध्द कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या संकल्पनेतून व्यासपीठाची रचना करण्यात आली आहे.
अनेक वाहनांमधून शनिवारी रात्री उशिरापासून कार्यकर्ते मुंबईत येण्यासही सुरूवात झाली असून त्यांची सभास्थानाच्या जवळील मैदानात व्यवस्था करण्यात आली आहे. रविवारी सकाळपासूनच हजारो कार्यकर्ते दाखल होतील, असे भाजपकडून सांगण्यात आले.