आजपासून कामावर रुजू; न्यायालयाने फटकारल्यानंतर डॉक्टर नमले

उच्च न्यायालयात डॉक्टरांच्या ‘मार्ड’ संघटनेने दिलेले लेखी निवेदन व राज्य सरकारच्या आश्वासनानंतर इंडियन मेडिकल असोसिएशनने मागे घेतलेल्यानंतर अखेर रात्री उशिरा निवासी डॉक्टरांची संघटना ‘मार्ड’ने रजा आंदोलन मागे घेतले आहे. मात्र डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू न होण्याची भूमिका घेतल्याने शुक्रवारी रात्री आपत्कालीन विभाग वगळता इतर सेवा कोलमडल्या होत्या.

निवासी डॉक्टरांना रुग्णांच्या नातेवाईकांकडून झालेल्या बेदम मारहाणीनंतर सुरू झालेले आंदोलन आटोक्यात आणण्यासाठी राज्य सरकारने केलेले प्रयत्न पाचव्या दिवशीही अपुरे पडले. एवढेच नाही तर उच्च न्यायालयाने फटकारून व लेखी हमी घेऊनही निवासी डॉक्टरांनी तातडीने कामावर रुजू होण्याची तयारी दाखवली नाही.

गुरुवारी उच्च न्यायालयाने संप मागे घेण्यास सांगितल्यावर निवासी डॉक्टरांची संघटना असलेल्या ‘मार्ड’ने पत्रक काढून सर्व डॉक्टरांना कामावर रुजू होण्याची विनंती केली. मात्र त्यानंतरही शुक्रवारी काही निवासी डॉक्टरांचा अपवाद वगळता इतरांनी रजा आंदोलन कायम ठेवले. शुक्रवारी उच्च न्यायालयाने फटकारून ‘मार्ड’च्या अध्यक्षांकडून लेखी जबाब लिहून घेतल्यावरही संध्याकाळी डॉक्टरांच्या संपाचा तिढा कायम राहिला. अखेर रात्री उशिरा रजा आंदोलन मागे घेण्यात आले.

 

उपचार न केल्याने डॉक्टरला शिवीगाळ

उल्हासनगर : एक वर्षांच्या आजारी मुलावर उपचार न केल्याचा राग धरून एका डॉक्टरला शिवीगाळ करण्याचा प्रकार उल्हासनगरमध्ये समोर आला आहे. उल्हासनगर-४ मधील गिरिजा रुग्णालयात हा प्रकार घडला असून या प्रकरणी मुलाच्या वडिलांविरोधात अदखलपात्र गुन्हय़ाची नोंद करण्यात आली आहे.

आशीष रोकडे हा आपला एक वर्षांचा मुलगा आरुष हा सारख्या उलटय़ा करीत असल्याने त्याला शहरातील दोन ते तीन खासगी रुग्णालयात घेऊन गेला होता. मात्र संप असल्याने रुग्णालयात घेण्यास डॉक्टरांनी नकार दिला. अखेर शेवटचा प्रयत्न म्हणून आशीष रोकडे आणि त्याची पत्नी प्रणाली ही उल्हासनगर-४ येथील गिरिजा रुग्णालयात आले. त्यांनी डॉक्टरांना आपल्या मुलास तपासण्याची विनंती केली. मात्र डॉक्टरांचा संप आहे , असे डॉक्टर एन. एम. सदाफुले यांनी त्यांना सांगितले. डॉक्टरांच्या अशा उत्तराने मुलांचे वडील रोकडे अधिकच संतापले आणि त्यांनी डॉक्टरांना धमकावले. त्यामुळे काही काळ रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. अखेर रोकडे यांनी आपल्या मुलाला पुन्हा दुसऱ्या रुग्णालयात हलवले.या प्रकरणी डॉक्टरांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.