उच्च न्यायालयाचा निर्वाळा; ‘लिव्ह इन रिलेशनशिप’ मान्य करण्यास नकार

केवळ कुंकू लावल्याने वा गळ्यात मंगळसूत्र बांधून लैंगिकनातेसंबंध ठेवणाऱ्या जोडप्याला विवाहित म्हणता येणार नाही, कायद्याच्या कसोटीवर या विवाहाला काहीच महत्त्व नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे. १९५५ सालच्या हिंदू विवाह कायद्याचा दाखला न्यायालयाने त्यासाठी दिला आहे.

कुटुंब न्यायालयाने पहिल्या पतीपासून दोन मुले असलेल्या या महिलेच्या बाजूने निकाल दिला होता व तिचे वैवाहिक हक्क तिला उपलब्ध करण्याचे आदेश दिले होते. याचिकाकर्त्यां महिलेचा घटस्फोट झालेला असला तरी मुलांसाठी ती पहिल्या पतीसोबतच राहत होती; परंतु व्यावसायिकाचे लग्न ठरल्याचे समजताच तिने कुटुंब न्यायालयात धाव घेत त्यांचे लग्न झाल्याचा दावा केला होता. तसेच वैवाहिक हक्कांची मागणी केली होती. लग्नाचे आमिष दाखवून त्याने आपले लैंगिक शोषण केल्याचा आरोपही तिने त्याच्यावर केला होता व त्याच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती. परंतु व्यावसायिकाकडून दोन लाख रुपये देण्यात आल्यावर तिने त्याच्याविरोधातील तक्रार मागे घेतली.

योग्य रीतिरिवाज आवश्यक

कृष्णाच्या मूर्तीसमोर त्याने माझ्या कपाळावर कुंकू लावले आणि गळ्यात मंगळसूत्र बांधले, असा दावा करणाऱ्या आणि त्याच आधारे वैवाहिक हक्कांची मागणी करणाऱ्या ३८ वर्षांच्या महिलेच्या याचिकेवर निकाल देताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला. लग्नसोहळा योग्य रीतिरिवाजानुसार झाला नसेल तर त्याला कायद्याच्या भाषेत विवाह म्हणता येऊ शकत नाही. याचिकाकर्त्यां महिलेचा ४० वर्षांच्या व्यावसायिकाशी विवाह झाला हे सांगणारा त्यांच्या समाजातील कुणीही साक्षीदार नाही. त्यामुळे या विवाहाला कायद्यानुसार वैधता नाही. एवढेच नव्हे, तर ते दोघे कधीही एकत्र राहिले नाहीत. ही बाब लक्षात घेता ते दोघे ‘लिव्ह इन रिलेशनशिप’मध्ये राहत होते हे मान्य करण्यासही न्यायालयाने नकार दिला.