ऐन सणासुदीच्या दिवशी तांत्रिक बिघाडामुळे मुंबईची लोकलसेवा विस्कळीत होण्याची परंपरा शुक्रवारी, विजयादशमीलाही कायम राहिली. दसऱ्याच्या निमित्ताने घराबाहेर पडलेल्यांची लोकलमध्ये गर्दी उसळली असतानाच दुपारी कुर्ला स्थानकाजवळ पेंटाग्राफ तुटून मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली. ती पूर्ववत रुळावर येते न तोच, कल्याणजवळ लोकलचा डबा घसरून वाहतूक पुन्हा ठप्प झाली. लोकल रुळांवरून घसरण्याची ही महिनाभरातील पाचवी वेळ आहे.
चाप चोरीस जात असल्याने अपघात
कल्याण स्थानकाच्या फलाट क्रमांक एकवरून सायंकाळी ५.०२ वाजता छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे निघालेली लोकल धीम्या मार्गावरून जलद मार्गावर जाण्यासाठी रुळ बदलत असतानाच सांध्यावरून गाडीचा सातवा डबा घसरला. लोकलचा वेग कमी असल्याने या दुर्घटनेत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, धीम्या आणि जलद मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद पडली. ठाणे, मुलुंड, भांडुपदरम्यान धीम्या मार्गावर लोकलच्या रांगा लागल्या. कर्जतच्या दिशेने ठाण्याकडे येणाऱ्या लोकलही खोळंबल्या. त्यामुळे अनेक प्रवाशांना उडय़ा ठोकत रेल्वे मार्गावरून चालण्यास सुरुवात केली. डबा रुळावर आणण्यास रात्रीचे पावणे आठ वाजले. तोपर्यंत २५ गाडय़ा रद्द कराव्या लागल्याने प्रवाशांची अक्षरश: दैना उडाली. तत्पूर्वी, दुपारी दोनच्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एकवर उभ्या असलेल्या अंबरनाथ लोकलचा पेंटोग्राफ तुटल्याने सर्वच मार्गावरील वाहतूक सुमारे दीड तास विस्कळीत झाली होती.