गेल्या मार्चपासून बंद असलेली मुंबईची उपनगरी (लोकल) रेल्वेसेवा सर्वासाठी सुरू करण्याबाबतचा निर्णय येत्या मंगळवापर्यंत घेण्यात येईल, असे राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी शुक्रवारी उच्च न्यायालयात सांगितले. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत नसलेल्या उपनगरांतील लाखो प्रवाशांना लवकरच दिलासा मिळणार आहे.
उच्च न्यायालयासह कनिष्ठ न्यायालयेही पूर्ण क्षमतेने सुरू झाली असल्याने वकिलांनाही लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी करणारी याचिका वकिलांच्या संघटनेने दाखल केली आहे. न्यायालयाच्या हस्तक्षेपानंतर वकिलांना विशिष्ट वेळेत लोकल प्रवास करण्याची मुभाही देण्यात आली आहे. मात्र सर्वासाठी उपनगरीय रेल्वेसेवा कधी सुरु होणार याबाबत सामान्य नागरिकांमध्ये कुतूहल आहे.
मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याचिकेवर सुनावणी झाली. या वेळी सर्वसामान्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्याबाबत न्यायालयाने महाधिवक्त्यांकडे विचारणा केली. लोकल प्रवासाबाबत न्यायमूर्तीच्या प्रशासकीय समितीची नुकतीच वकील संघटनेबरोबर बैठक झाली. त्यावेळी सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवासाबाबत एका चार दिवसांत निर्णय घेतला जाईल, असे महाधिवक्त्यांनी सांगितले होते. मुख्य न्यायमूर्तीनी शुक्रवारच्या सुनावणीत महाधिवक्त्यांचे त्याकडे लक्ष वेधले. त्यावर न्यायालयाने दिलेली मुदत मंगळवारी संपत असून तोपर्यंत याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे महाधिवक्त्यांनी स्पष्ट केले. तसेच या प्रकरणाची सुनावणी बुधवारी ठेवण्याची विनंती केली.
वकिलांना अद्याप सायंकाळी ४ ते ७ या वेळेत लोकलने प्रवास करू दिला जात नाही. त्यांना परतीचे तिकिट तसेच मासिक पास देण्यासही नकार दिला जात असल्याचे याचिकाकर्त्यांच्या वतीने अॅड्. उदय वारूंजीकर यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले. त्यावर परतीचे तिकीट दिल्यावर गर्दीच्या वेळीही काहीजण प्रवास करतात, असे सरकारतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले.
झाले काय?
आता सर्व व्यवहार पूर्ववत होत असून लोकल रेल्वेसेवा सर्वासाठी केव्हा सुरू करणार, अशी विचारणा न्यायालयाने शुक्रवारी राज्य सरकारला केली असता, मंगळवापर्यंत याबाबतचा निर्णय घेण्यात येईल, असे महाधिवक्ता कुंभकोणी यांनी स्पष्ट केले.
गरज का?
करोना विषाणूची साथ पसरल्यानंतर गेल्या मार्चमध्ये देशभर टाळेबंदी लागू करण्यात आली. त्याचवेळी मुंबईतील उपनगरी रेल्वेसेवाही बंद करण्यात आली. त्यानंतर काही महिन्यांनी टप्प्याटप्प्याने प्रथम अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना, करोना नियंत्रण आघाडीवरील कर्मचाऱ्यांना, नंतर महिलांना उपनगरी रेल्वे प्रवासाची मुभा देण्यात आली. परंतु सर्वसामान्य प्रवासी मात्र अद्याप प्रतीक्षेत आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 9, 2021 1:54 am