विरारच्या प्रवाशांची संतप्त प्रतिक्रिया; वातानुकूलित लोकलमुळे सामान्य लोकल फेऱ्यांवर परिणाम

पश्चिम रेल्वेवर सुरू झालेली वातानुकूलित लोकल आत बसणाऱ्या प्रवाशांसाठी आरामदायी ठरत असली, तरी फलाटावरच्या सामान्य प्रवाशांना मात्र, ही आतापासूनच नकोशी झाली आहे. नववर्षांच्या मुहूर्तावर विरारपासून चालवण्यास सुरुवात झालेल्या एसी लोकलला पहिल्याच दिवशी अल्प प्रतिसाद मिळाला. तर, या लोकलमध्ये गर्दीच्या वेळेतील नेहमीच्या लोकलगाडय़ा रद्द झाल्याने प्रवाशांचे हाल झाले.

वातानुकूलित लोकलचे १ जानेवारी २०१८ पासून १२ लोकल फेऱ्यांचे नवीन वेळापत्रक लागू करण्यात आले. वेळापत्रक लागू करताना चर्चगेट ते विरार ते चर्चगेट अशा एकूण आठ लोकल फेऱ्या चालवण्यास सुरुवात केली. परंतु याच मार्गावरील सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याने बोरिवलीपाठोपाठ विरारकरांचीही गैरसोय होऊ लागली आहे. सकाळी विरारहून १०.२२ वाजता, दुपारी १.१८ वाजता, सायंकाळी ४.२२ वाजता विरार ते चर्चगेट वातानुकूलित लोकल सोडण्यात आल्या. मात्र त्याचवेळी सध्याच्या लोकल पकडण्यासाठी आलेल्या अनेक प्रवाशांना याची माहिती नसल्याने त्यांची मोठी गैरसोय झाली.

नेहमीप्रमाणे बोरिवली स्थानकातील फलाट क्रमांक ६ वर दुपारी ३.३९ वाजताच्या विरार जलद लोकलसाठी प्रवासी उभे होते. मात्र नियमित लोकलऐवजी एसी लोकल आल्याने विरार प्रवाशांचा गोंधळ उडाला. अनेकांना  तर या लोकलविषयी कल्पना देखील नव्हती. यामुळे नियमित लोकल चुकल्याने बहुतांश प्रवाशांनी फलाट क्रमांक ४ वरून सुटणाऱ्या बोरिवली-विरार लोकलचा पर्याय अवलंबला. यामुळे फलाट क्रमांक ६ वरून फलाट क्रमांक ४ वरील बोरिवली-विरार लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची दमछाक झाली. त्यात त्या लोकलमध्ये आधीपासूनच दहिसर मीरारोड येथून प्रवाशांनी उलटा प्रवास केल्याने लोकलमध्ये एकच गर्दी झाली आणि अनेक प्रवाशांना त्या लोकललाही मुकावे लागले.

विरारहून चर्चगेटसाठी सुटणाऱ्या काही जलद लोकल फेऱ्या बोरिवलीनंतर धीम्या होतात. तर चर्चगेटहून विरारसाठी सुटणाऱ्या जलद लोकल बोरिवलीनंतरही धीम्या होतात. त्यामुळे वातानुकूलित लोकल गाडी चालवण्यात येत असल्याने विरार ते बोरिवलीदरम्यानच्या प्रवाशांचे काय, असा सवाल उपस्थित होत आहे.