केनियाची राजधानी नैरोबीतील मॉलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रमाणे मुंबईतही हल्ला होण्याची भीती असून केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) शहरातील सर्व मॉल्सना अतिदक्षतेचा इशारा दिला आहे.
केनियाप्रमाणेच मुंबईत मॉल्सवरही दहशतवादी हल्ला करू शकत असल्याची माहिती सीआयएसएफने दिली आहे. नैरोबीत १२ सप्टेंबरला झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७२ जण ठार झाले होते. मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानेही या वृत्तास दुजोरा दिला आहे. या पाश्र्वभूमीवर शहरातील सर्व मॉल्सच्या सुरक्षेचा आढावा घेण्यात आला असून त्यांना अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षाव्यवस्था अधिकाधिक कठोर करण्याचे आदेशही मॉल्सच्या प्रशासनांना देण्यात आले आहेत. नैरोबीतील हल्ल्यानंतर आम्ही मुंबईतल्या सर्व मॉल्सच्या सुरक्षेची तपासणी सुरू केली होती आणि सर्व संबंधितांना सूचनाही दिल्या होत्या अशी माहिती मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.