महापालिकेचे घूमजाव

मुंबई मॅरेथॉनला व्यावसायिक कार्यक्रम ठरवून आयोजकांना तातडीने साडेपाच कोटी रुपये भरण्याची नोटीस पाठवणाऱ्या पालिकेने शनिवारी घूमजाव केले. मॅरेथॉन आयोजकांनी पाठवलेली २३ लाख रुपयांची पे ऑर्डर मान्य करून पालिकेने कार्यक्रमाला परवानगी दिल्याने रविवारी सकाळी होणाऱ्या मॅरेथॉनचा मार्ग मोकळा झाला. त्याचबरोबर वांद्रे कुर्ला संकुल येथे होणाऱ्या सन बर्न या कार्यक्रमालाही पोलिसांनी सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत परवानगी दिली आहे.

गेली १३ वर्षे मुंबई मॅरेथॉन सुरू आहे. या कार्यक्रमामागील सामाजिक उद्देश लक्षात घेऊन पालिकेने सुरुवातीला या कार्यक्रमांना अनुदानित स्वरूपात शुल्क आकारले होते. मात्र गेल्या काही वर्षांत जाहिराती व ब्रॅण्डिंग वाढल्याने पालिकेने मॅरेथॉनला व्यावसायिक कार्यक्रम ठरवून त्यानुसार ५ कोटी ४८ लाख ३० हजार ६४३ रुपये शुल्क आकारले. यात जाहिरात, भू वापर व सुरक्षा ठेव अंतर्भूत आहेत.

मात्र आयोजकांनी हे पत्र घ्यायचे नाकारून कार्यक्रमाची तयारी सुरू ठेवली. सरतेशेवटी ए वॉर्डकडून आयोजक प्रोकॅम इंटरनॅशनलला नोटीस पाठवण्यात आली. रक्कम वेळेत भरली नाही तर अनधिकृत जाहिरात फलक लावल्याप्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार दाखल करण्यात येईल, अशी भीती घातल्यावरही आयोजकांनी पैसे भरण्याऐवजी पालिकेची पत्राद्वारे बोळवण केली.

कार्यक्रमावर जाहिरात शुल्क आकारण्याबाबत पालिकेचा काहीतरी गैरसमज झालेला आहे. मात्र या घडीला हा गैरसमज दूर करणे शक्य नसल्याने सध्या गेल्या वर्षीएवढे शुल्क घेऊन कार्यक्रमाला जाहिरात फलकांसह परवानगी द्यावी असे पत्र व सोबत २३ लाख रुपयांची पे ऑर्डर ए वॉर्डला पाठवण्यात आली. त्यानंतर ए विभागाने मॅरेथॉनच्या आयोजनाला परवानगी दिली. येत्या रविवारी होणाऱ्या ‘मुंबई मॅरेथॉन’च्या आयोजकांनी ठिकठिकाणी झळकविण्यात येणाऱ्या बॅनर्सपोटी ५.४८ कोटी रुपये अद्याप भरलेले नाहीत.  ही रक्कम न भरल्यास बॅनर्स झळकवून मुंबईचे विद्रूपीकरण केल्याप्रकरणी आयोजकांविरुद्ध खटला दाखल करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.

सनबर्नलाही मुभा

वांद्रे कुर्ला संकुलात १३ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आलेल्या सनबर्न या कार्यक्रमाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती. आयोजकांनी कायदेशीर बाबींची पूर्तता न केल्याने परवानगी नाकारल्याचे सांगण्यात आले. आता हा कार्यक्रम रविवारी सकाळी ११ ते ४ या वेळेत वांद्रे कुर्ला संकुलात करण्यासाठी परवानगी दिल्याची माहिती मुंबई पोलीस दलाचे प्रवक्ता पोलीस उपायुक्त अशोक दुधे यांनी दिली.

पालिका अधिकाऱ्यांच्या सोयीनुसार सोमवारनंतर भेटून मॅरेथॉनचे आयोजक बाजू मांडणार आहेत. त्यानंतर पालिकेचा निर्णय मान्य करण्याची त्यांची तयारी असल्याने मुंबई मॅरेथॉनला परवानगी दिली आहे.    – किरण दिघावकर, साहाय्यक आयुक्त, ए वॉर्ड