रस्त्यावर आणि सखल भागात पाणी साठू नये, यासाठी पालिका पिपग स्टेशनसह अनेक उपाययोजना राबवत असली तरी मुसळधार पाऊस व भरतीच्या वेळा एकत्र आल्यास पाणी साठण्याची समस्या दरवर्षी उद्भवते. यावर्षी पावसाळ्याच्या चार महिन्यात २२ वेळा साडेचार मीटरहून अधिक भरती येणार आहे.
कमी पावसाची शक्यता वेधशाळेकडून वर्तवण्यात आली असली तरी आतापर्यंत कोणताही अंदाज १०० टक्के योग्य ठरलेला नाही. त्यातच मुंबई ही देशातील सर्वाधिक पावसाच्या क्षेत्रात येते. तासाला ६० मिमीपेक्षा जास्त वेगानेही पाऊस पडण्याच्या घटना शहराला नवीन नाहीत.
मुंबईच्या बहुतांश भागांचे काँक्रिटीकरण झाल्याने जमिनीत पाणी झिरपण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. अशा वेळी पावसाचे पाणी समुद्राकडे नेण्याचा पूर्ण भार पर्जन्य जलवाहिन्यांवर येतो. मात्र भरतीच्या वेळी समुद्राची पातळी उंचावली  असल्याने भरतीचे पाणी या वाहिन्यांमधून शहरात येण्याची भीती असते.