महापौरांचा पालिका प्रशासनाला इशारा

मुंबई : शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकासाठी विद्यमान महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांना लवकरच शिवाजी पार्क येथील महापौर बंगला रिकामा करावा लागणार असून मुंबईच्या मध्यवर्ती भागात नवा महापौर बंगला उभारण्यासाठी प्रशासनाने दोन जागा निश्चित केल्या आहेत. मात्र सध्याचा बंगला रिकामा केल्यानंतर प्रशासनाने आपल्या पदाला साजेसा बंगला उपलब्ध करावा असे महापौरांनी सूचित केले आहे. तोपर्यंत मलबार हिल येथील जलअभियंत्यांच्या बंगल्यात आपली तात्पुरती सोय करण्यात यावी, अशी मागणी महापौरांनी केली आहे. मात्र प्रशासन बंगला उपलब्ध करण्यात अपयशी ठरल्यास आपण वास्तव्यासाठी थेट सांताक्रूझ येथील आपल्या निवासस्थानी निघून जाऊ, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा निश्चित केली आहे. लवकरच आवश्यक त्या बाबींची पूर्तता करण्यात येणार असून त्यानंतर महापौरांना हा बंगला रिकामा करावा लागणार आहे. प्रशासनाने महापौरांच्या वास्तव्यासाठी वीरमाता जिजाबाई भोसले प्राणिसंग्रहालय आणि उद्यानातील (राणीची बाग) उद्यान अधीक्षकांच्या बंगल्याची निवड केली होती. परंतु महाडेश्वर यांनी या बंगल्याला नापसंती दर्शवत मलबार हिल येथील जलअभियंत्यांच्या बंगल्याला पसंती दर्शविली होती. या बंगल्यामध्ये सध्या सनदी अधिकारी प्रवीण दराडे आणि पल्लवी दराडे वास्तव्यास आहेत. सध्या या दोघांपैकी एकही पालिकेच्या सेवेत नाहीत. त्यामुळे हा बंगला  रिकामा करण्यासाठी पालिका प्रशासनाने दराडे दाम्पत्यावर नोटीस बजावली आहे. परंतु अद्याप हा बंगला पालिकेच्या ताब्यात आलेला नाही. त्यामुळे प्रशासनाने महालक्ष्मी आणि दादर परिसरातील दोन भूखंड महापौर बंगल्यासाठी निवडले असून तेथे नवा बंगला बांधून देण्याची तयारी प्रशासनाने दर्शविली आहे. प्रशासनाने सुचविलेल्या दोन्ही जागांची पाहणी करण्यात येईल आणि त्यानंतर त्यापैकी एका भूखंडाची महापौर बंगल्यासाठी निवड करण्यात येईल. तत्पूर्वी बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी सध्याचा महापौर बंगला रिकामा करावा लागणार आहे. नवा बंगला बांधून होईपर्यंत महापौरांचा मान राखला जाईल असे निवासस्थान उपलब्ध करून देण्याची जबाबदारी पालिका प्रशासनाची आहे. प्रशासनाने महापौरांचा आब राखणारे निवासस्थान उपलब्ध करून दिले नाही, तर आपण सांताक्रूझ येथील आपल्या निवासस्थानी वास्तव्यासाठी निघून जाऊ, असा इशारा विश्वनाथ महाडेश्वर यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिला.