फलाटांची लांबी वाढविण्यासाठी खर्चात १२५ कोटींची वाढ

मुंबई : ‘मेट्रो ३’ (कुलाबा ते सीप्झ) ही मार्गिका साकी विहार स्थानकाजवळ ‘मेट्रो ६’ला (स्वामी समर्थ नगर ते विक्रोळी) जोडली जाईल, तर मेट्रो ३च्या रेल्वेगाडीसाठी मेट्रो ६च्या मार्गिकेवरील काही स्थानकांच्या फलाटांची लांबी वाढवावी लागणार असल्यामुळे सुमारे १२५ कोटी रुपयांची वाढ होईल.

मेट्रो ३चे आरेमधील कारशेड कांजूरमार्ग येथे हलविल्यामुळे मेट्रो ६च्या मार्गिकेवर काही बदल करावे लागणार आहेत. मेट्रो ३ मार्गिका ही सीप्झपर्यंत भुयारी असून, त्यानंतर जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडच्या पलीकडे ती भुयारातून वर येते. मेट्रो ३चे कारशेड हलविल्यामुळे कांजूरमार्गला जाण्यासाठी ही मार्गिका मेट्रो ६ वर साकी विहार आणि सीप्झ दरम्यान जोडण्याचे नियोजन असल्याचे एमएमआरडीएचे महानगर आयुक्त आर. ए. राजीव यांनी सांगितले.

मेट्रो ३ची रेल्वेगाडी ही आठ डब्यांची आहे, तर मेट्रो ६ची गाडी सहा डब्यांची. त्यामुळे मेट्रो ३ मार्गिका जेथून जोडली जाईल, त्यापुढील स्थानकातील फलाटांची लांबी वाढवावी लागेल. त्यासाठी १२५ कोटी रुपये अतिरिक्त खर्च अपेक्षित असल्याचे राजीव यांनी सांगितले. मेट्रो ६चा सध्याचा प्रस्तावित खर्च सहा हजार ७१६ कोटी रुपये आहे.  कांजूरमार्ग येथील दोन्ही मार्गिकांचे डेपो स्वतंत्र असतील, असे त्यांनी नमूद के ले.

अकरा महिने मेट्रो ३च्या कारशेडचे काम ठप्प असणे, टाळेबंदीचा झालेला परिणाम यांमुळे आणि कारशेड कांजूरमार्गला गेल्याने दोन्ही मार्गिका जोडाव्या लागणार असल्याने प्रकल्पपूर्ती वर्ष ते दीड वर्षांनी लांबू शकते, असे अधिकाऱ्यांनी नमूद केले. एमएमआरडीएच्या माध्यमातून २०२६ पर्यंत मुंबई आणि महानगर क्षेत्रात एकूण ३३७ किमीची मार्गिका कार्यान्वित करण्याचे उद्दिष्ट आहे. या सर्व मार्गिकांच्या संचलनासाठी महामुंबई मेट्रो संचलन महामंडळाची निर्मिती गेल्या वर्षी जूनमध्ये करण्यात आली. भविष्यात मेट्रो ३ मार्गिकेचे संचलनदेखील याच महामंडळाकडे दिले जाणे योग्य असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मेट्रो ३ भुयारातून बाहेर येते, त्या ठिकाणी आरेच्या सुरुवातीस असणाऱ्या प्रजापूर पाडा या ठिकाणी रॅम्पचे काम गेल्या महिन्यापर्यंत सुरू होते. या रॅम्पवरून मेट्रो ३ची रेल्वेगाडी कारशेडमध्ये जाण्याचे नियोजन यापूर्वी होते. मात्र कारशेड कांजूरमार्गला हलविल्यामुळे येथूनच मेट्रो ६ मार्गिकेकडे वळवावी लागेल.

कांजूरमार्ग येथे तीन मेट्रो मार्गिका एकत्र

मेट्रो ३चा डेपो कांजूरमार्ग येथे हलविल्यामुळे भविष्यात या ठिकाणी तीन मार्गिका एकत्र येतील. कांजूरमार्ग ते बदलापूर असे मेट्रो १४ मार्गिकेचे नियोजन एमएमआरडीएने प्रस्तावित केले आहे. त्यामुळे बदलापूर ते आंतरराष्ट्रीय विमानतळ, वांद्रे-कुर्ला संकुल, कुलाबा अशी जोडणी होईल. २२ लाख प्रवाशांना याचा लाभ मिळू शकेल.