पश्चिम उपनगरातील मार्गिका पावसाळय़ापर्यंत वाहतुकीस खुल्या होणार

‘मेट्रो’च्या कामासाठी पश्चिम द्रुतगती महामार्ग आणि लिंक रोड या सर्वाधिक वाहतुकीच्या रस्त्यांवर अडविण्यात आलेल्या वाहनांच्या दोन मार्गिका पावसाळ्यापूर्वी खुल्या होणार आहेत. या परिसरात दीड वर्षांपासून सुरू असलेले मेट्रोचे सुमारे ५० टक्के काम पूर्ण झाल्याने येथील काही ठिकाणचे अडथळे (बॅरिकेड्स) हटविण्यात येणार आहेत. त्यामुळे दोन्ही बाजूच्या (पूर्व व उत्तर) प्रत्येकी एक मार्गिका वाहतुकीसाठी खुल्या होणार आहेत. त्यामुळे पश्चिम उपनगरीय प्रवाशांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. येत्या पावसाळ्यापूर्वी या मार्गावरील अडथळे दूर होतील, अशी ग्वाही एमएमआरडीए आणि वाहतूक पोलिसांनी दिली.

पश्चिम उपनगरातील दहिसर ते अंधेरीपर्यंतचा परिसर दोन मेट्रोंनी जोडण्याचे काम ‘मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा’मार्फत (एमएमआरडीए) सुरू आहे. मेट्रो २ ए (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो-७ (अंधेरी (पू) ते दहिसर (पू) या दोन्ही मिळून जवळपास ३० किलोमीटरच्या रस्त्यांवर मेट्रोची कामे दीड वर्षांपूर्वी सुरू झाली. हे दोन्ही रस्ते प्रचंड वर्दळीचे आहेत. मेट्रोची कामे सुरू झाल्यानंतर हे रस्ते आक्रसले. त्यामुळे वाहनांतून प्रवास करणाऱ्यांचे हाल सुरू झाले. काही ठिकाणी एक, काही ठिकाणी दोन मार्गिका ताब्यात घेण्यात आल्याने वाहतुकीचा वेग प्रचंड मंदावला होता. मात्र या दोन्ही मार्गावरील मेट्रोचे खांब आणि गर्डर टाकण्याचे बहुतांश काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे या मार्गावरील पूर्व आणि उत्तरेकडील प्रत्येकी एक  मार्गिका ३१ मेपर्यंत वाहतुकीकरिता खुल्या होतील, असे पोलिस सहआयुक्त (वाहतूक) अमितेश कुमार यांनी सांगितले.

मेट्रोच्या कामापैकी जवळपास ५० टक्के कामे पूर्ण झाल्याने येथील दोन्ही ठिकाणचे अडथळे आम्ही काढून घेणार आहोत, असे सांगत एमएमआरडीएचे सह महानगर आयुक्त दिलीप कवठकर यांनी या माहितीला दुजोरा दिला. पावसाळ्यातही मेट्रोची कामे सुरू राहणार आहेत. मात्र, या दोन प्रमुख मार्गावरील अडथळे मागे घेण्यात येणार असल्याने पावसाळ्यात प्रवाशांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा कुमार यांनी व्यक्त केली.

वडाळा ते ठाणे</strong> मार्ग आक्रसणार

मुंबईतील आणखी दोन म्हणजे मेट्रो-४ आणि मेट्रो-२बी यांचे काम जूनपासून सुरू होणार आहे. या मेट्रोंकरिता २४ महिन्यांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे पुढील मार्गावरील वाहतुकीस

अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे.

  • वडाळ्यातील भक्ती पार्क ते आणिक बस डेपोमार्गे चेंबूरमधील सुमन नगर
  • पूर्व द्रुतगती महामार्गावरून अमर महल जंक्शनपर्यंत.
  • गरोडिया नगर येथून लालबहाद्दूर शास्त्री मार्गापर्यंत.
  • मुलुंड टोल नाक्यापासून ठाण्यापर्यंत.