मुंबई महापालिकेतील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नगरसेवक सुधीर जाधव यांना महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी आज दादर पोलिसांनी अटक केली आहे. एका महिलेला व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह मेसेज आणि व्हिडीओ कॉल केल्याचा आरोप सुधीर जाधव यांच्यावर आहे. अश्लिल मेसेज केल्याची तक्रार संबंधित महिलेने केल्यानंतर पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता.

मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्या पत्नी स्नेहल जाधव यांना मनसेने उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी सुधीर जाधव संबंधित महिलेच्या घरी गेले होते. त्यानंतर जाधव यांनी व्हॉट्सअॅपवरून रात्रभर आक्षेपार्ह मेसेज पाठवले. तसेच व्हिडीओ कॉलही केला होता. या प्रकरणी पोलिसांत तक्रार न करण्याची धमकीही सुधीर जाधव यांनी दिली होती, असा आरोपही तक्रारदार महिलेने केला आहे. महिलेच्या तक्रारीवरून दोन दिवसांपूर्वी दादर पोलिसांनी सुधीर जाधव यांच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर आज जाधव यांना दादर पोलिसांनी अटक केली आहे.

दरम्यान, महिलेने दादर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर सुधीर जाधव यांनी सर्व आरोपांचे खंडन केले होते. माझ्यावर केलेले आरोप हे राजकीय हेतूने केल्याचे जाधव यांनी म्हटले होते. महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अशा प्रकारचे आरोप करण्यात येत आहेत. मी कोणतेही गैरकृत्य केलेले नाही, असे त्यांनी सांगितले होते. पोलीस आणि न्यायालयीन चौकशीत सर्व सत्य समोर येईल, असेही जाधव यांनी सांगितले होते.