पूर्व उपनगरात दुर्गंधीमुळे रहिवासी भयभीत; गळतीचा शोध घेण्यात पालिका हतबल

मुंबई : पूर्व उपनगरात शनिवारी दुपारी अचानक दुर्गंधी येऊ लागली आणि पुन्हा एकदा वायुगळतीच्या संशयामुळे येथील नागरिक भयभीत झाले. गेल्या दोन वर्षांमध्ये चार वेळा असे प्रकार घडले असून वारंवार होणाऱ्या या प्रकारांमुळे पूर्व उपनगरातील वायुगळतीचे गूढ अधिकच वाढले आहे. वायुगळतीच्या वाढत्या प्रकारांमुळे रहिवाशी त्रस्त झाले आहेत, तर गळतीचा शोध घेण्यात पालिका हतबल ठरली आहे.

गोवंडी, घाटकोपर, विक्रोळी आणि पवई या भागात शनिवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास मोठय़ा प्रमाणात वायुगळती होऊ लागली आणि नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागला. नागरिकांनी वायुगळती होत असल्याच्या तक्रारी अग्निशमन दलाकडे केल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी वायुगळतीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला, मात्र नेहमीप्रमाणे वायुगळती कुठून होते याचा शोध लागला नाही. काही महिन्यांनी परिसरात दुर्गंधी पसरण्याचा प्रकार पूर्व उपनगरात वाढत असून रहिवाशांना भेडसावणारी ही समस्या ऐरणीवर आली आहे. पण काही वेळाने दुर्गंधी निघून जाते आणि हा प्रश्नही हवेत विरून जातो, अशी खंत या परिसरातील रहिवाशांकडून व्यक्त करण्यात आली.

चेंबूर परिसरात बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ अशा अनेक केमिकल कंपन्या आहेत. त्यामुळे या भागात अशी व्यापक परिसरात दुर्गंधी येऊ लागली की साहजिकच कंपन्यांमधून वायुगळती होते की काय अशी भीती नागरिकांमध्ये निर्माण होते. त्यामुळे त्याचे गांभीर्य वाढते. अशा वेळी अग्निशमन दलाचा ताफा घटनास्थळी पोहोचतो आणि तपासणी के ली जाते. श्वास घेण्यास त्रास होत असेल तर नागरिकांनी नाकावर ओला रुमाल बांधावा अशा सूचना ध्वनिक्षेपकावरून दिल्या जातात. तसेच बीपीसीएल, एचपीसीएल, आरसीएफ, महानगर गॅस कंपनी यांच्या प्रतिनिधींनाही घटनास्थळी पाठवले जाते. मात्र दरवेळी वायुगळतीचे गूढ उकलत नाही.

९ सप्टेंबर २०१९ रोजी वायुगळती झाली त्या वेळी रहिवाशांनी पालिका, पोलीस आणि आपापल्या विभागातील गॅस कंपन्यांकडे शेकडो तक्रारी दाखल केल्या. त्या गळतीचा शोध लावण्यासाठी, सखोल अभ्यास करण्यासाठी व भविष्यागत अशी घटना घडू नये म्हणून उपाययोजना करण्यासाठी १६ विविध प्राधिकरणांच्या प्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली होती. मात्र त्यांनाही या गळतीचे गूढ सापडले नाही.

आतापर्यंतच्या दुर्घटना

’ १७ ऑक्टोबर २०२० रोजी दुपारी चार वाजता पूर्व उपनगरात दुर्गंधी येऊ लागली. रात्री पावणेआठ वाजता म्हणजे चार तासांनी हा वास येणे बंद झाले.

’ ७ जून २०२० रोजी रात्री दहाच्या सुमारास चेंबूर, गोवंडीपासून ते थेड अंधेरीपर्यंतच्या परिसरात विशिष्ट दुर्गंधी येत होती. रात्रभर या गळतीचा शोध लागला नाही. गोवंडीतील एका औषध कंपनीतून ही गळती होत असल्याचा संशयही या वेळी व्यक्त करण्यात आला होता.

’ १९ सप्टेंबर २०१९ला रात्री पूर्व उपनगरात जी दुर्गंधी येऊ लागली ती दुसऱ्या दिवशी दुपापर्यंत सुरू होती.

‘आरोग्यावर परिणाम नाही’

आपल्याकडे ज्या मलनिस्सारण वाहिन्या आहेत, त्यामध्ये मिथेन वायू तयार होत असतो. हा वायू कुठे तरी जमा होतो आणि मग बाहेर पडतो. मात्र त्याची तीव्रता खूप जास्त नसल्यामुळे त्याचा शोध लागत नाही. मात्र वेगळा वास येतो म्हणून तो जाणवतो, अशी शक्यता आपत्कालीन विभागाचे उपायुक्त प्रभात रहांगदळे यांनी व्यक्त केली आहे. या वायूची तीव्रता कमी असल्यामुळे तो आरोग्यावर परिणाम करत नाही, तसेच वातावरणातील प्राणवायूचे प्रमाणही कमी झालेले नसते. त्यामुळे कोणी बेशुद्ध पडत नाही, असेही त्यांनी सांगितले.