मुंबई : मुंबई महापालिका शिक्षण समिती उत्तराखंडमधील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी नव्या वर्षांत दौऱ्यावर जाणार आहे. समितीच्या बैठकीत यासंदर्भातील प्रस्तावाला गुरुवारी मंजुरी देण्यात आली. भाजपने मात्र दौऱ्याला आक्षेप घेतला असून स्वखर्चाने अभ्यास दौरा करण्याची सूचना केली आहे.

पालिका शाळांचा दर्जा घसरत असून विद्यार्थीगळती वाढत आहे. त्यामुळे शिक्षण विभागाकडून गळती रोखण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात. त्यासाठी विविध देशांसह राज्यातील शिक्षण पद्धतीचा अभ्यास दौरा दर वर्षी आयोजित केला जातो. त्यानुसार मुंबईच्या पालिका शाळांमध्ये बदल केले जातात. यंदा नव्या वर्षांत पालिका शिक्षण समिती सदस्य उत्तराखंडातील डेहारडूनमधील शिक्षण पद्धतीचा अभ्यास करण्यासाठी जाणार आहेत.

यासंदर्भात बोलताना माजी शिक्षण समिती अध्यक्ष मंगेश सातमकर यांनी सांगितले, डेहराडून ही उत्तराखंडाची राजधानी आहे. डेहराडूनसोबतच आजूबाजूच्या इतर शहरांतील शिक्षण पद्धतींचाही अभ्यास करण्याची सूचना मांडली. त्याला शिवसेनेच्या सदस्यांनीही पाठिंबा दिला. मात्र भाजप नगरसेवक अनिष मकवाना यांनी अभ्यास दौऱ्याला विरोध दर्शवत पालिकेच्या पैशांऐवजी नगरसेवकांनी स्वखर्चाने दौऱ्यांचे आयोजन करावे. आतापर्यंतच्या दौऱ्यांमुळे पालिकेला कोणताही फायदा न होता तोटाच झाल्याचे ते म्हणाले. दरम्यान, शिक्षण समिती अध्यक्ष अंजली नाईक यांनी अशा दौऱ्यांमुळे शिक्षण पद्धतीत झालेले बदल स्पष्ट केले आणि डेहराडूनऐवजी उत्तराखंड असा बदल सुचवत दौऱ्याचा प्रस्ताव मंजूर केला.