मुंबई पोलिसांनी आफ्रोझ वादारीया उर्फ अहमद राझाला अटक केली आहे. आफ्रोझच्या अटकेमुळे अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आणि छोटा शकील विरोधात नवी माहिती हाती लागणार असून त्यामुळे तपासाला गती मिळणार आहे. छोटा शकीलचा विश्वासू साथीदार असलेला आफ्रोझ वादारीया हवालाचे व्यवहार हाताळायचा. त्याच्याविरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. त्याआधारावर त्याला मंगळवारी अटक करण्यात आली.

२६ जूनलाच वादारीया विरोधात लुक आऊट सर्क्युलर जारी करण्यात आले होते. आफ्रोझ वादारीया मंगळवारी मुंबई विमानतळावर उतरल्यानंतर लगेच त्याला ताब्यात घेण्यात आले. आफ्रोझ यूएईवरुन मुंबईला आला होता. वादारीया स्वत:च्या पासपोर्टवर प्रवास करायचा. त्याच्यावर मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाचे लक्ष होते.

गुन्हेगारी कट रचणे आणि खंडणीच्या आरोपांखाली आफ्रोझला अटक करण्यात आली आहे. पोलीस त्याला न्यायालयात हजर करुन खंडणी प्रकरणात चौकशीसाठी त्याची कोठडी मागतील. वादारीया छोटा शकील आणि दाऊदच्या सल्ल्यावरुन मुंबई आणि सूरतमध्ये हवालाचे व्यवहार करायचा. आफ्रोझ वादारीया दाऊदचा जवळचा साथीदार फहीम मचमचच्या थेट संपर्कात होता.