रुची नावाची तरुणी मार्च महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात आपला लॅपटॉप जुहू येथे एका रिक्षात विसरली होती. लॅपटॉप रिक्षामध्ये विसरलो असल्याचं लक्षात येताच रुचीने पोलीस ठाण्यात तक्रार केली होती. आपला लॅपटॉप पुन्हा परत मिळेल अशी अपेक्षाच रुचीने सोडली होती. पण मुंबई पोलिसांनी तत्परता दाखवत 48 तासांत रुचीला तिचा लॅपटॉप परत मिळवून दिला.

रुचीने तक्रार देताच पोलिसांनी तपास सुरु केला होता. पोलीस अधिकाऱ्यांच्या समन्वयामुळे काही वेळातच रिक्षाचा शोध लावत हरवलेला लॅपटॉर ताब्यात घेत तरुणीकडे सोपवला. आपला लॅपटॉप पुन्हा मिळाल्याने तरुणीचा आनंदही गगनात मावेनासा झाला होता. रुचीने ट्विटरच्या माध्यमातून मुंबई पोलिसांचे आभार मानले आहेत.

रुचीने ट्विटरवर लिहिलं आहे की, ‘मुंबई पोलिसांनी मन जिंकलं आहे. गेल्या आठवड्यात जुहू येथे रिक्षात मी लॅपटॉप विसरले होते. मुंबई पोलीस आयुक्त आणि मुंबई पोलिसांमधील समन्वय आणि मेहनतीमुळे मला माझा लॅपटॉप परत मिळाला आहे. तुमचे मानावे तितके आभार कमीच. धन्यवाद वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाव्हळ सर आणि पोलीस निरीक्षक देशमुख सर’.

रुचीने केलेल्या ट्विटला 160 जणांनी रिट्विट केलं असून एक हजार 700 जणांनी लाइक केलं आहे. मुंबई पोलिसांनी दाखवलेल्या तत्परतेचं ट्विटरकरांनी कौतुक केलं आहे.