मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची यावरुन महापालिका आणि रेल्वे प्रशासनात टोलवाटोलवी सुरु होती. पण अखेर महापालिकेने हा पूल आमचाच असल्याचं मान्य केलं आहे. दरम्यान पोलिसांच्या प्राथमिक तपासातही हा पूल पूर्णपणे पालिकेचा असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.

पूल कोसळून जीवितहानी ओढवताच पुलाची जबाबदारी नेमकी कोणाची, हा वाद रंगला होता. महापालिका आणि रेल्वेने तातडीने या पुलाची जबाबदारी झटकून टाकली होती. या दुर्घटनेनंतर ट्विटरवरून महापालिका, सरकार आणि रेल्वेवर जोरदार ट्विपण्णी सुरू झाली होती. पोलिसांनीही एफआयआरमध्ये रेल्वेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नाव टाकलं होतं. मात्र तपासादरम्यान पूल पालिकेचा असल्याचं समोर आल्यानंतर एफआयआरमध्ये आरोपी म्हणून टाकण्यात आलेलं रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं नाव हटवण्यात येणार आहे. संध्याकाळपर्यंत आरोपींची नावे एफआयआरमध्ये समाविष्ट करण्यात येणार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाजवळील पूल दुर्घटनेसंबंधी २४ तासात अहवाल द्या असा आदेश महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी दिला आहे. दक्षता विभागाला हा आदेश देण्यात आला आहे. अजॉय मेहता यांनी ऑडिट, सुचवलेली दुरुस्ती याबाबत माहिती देण्यास बजावलं आहे. याआधी सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुर्घटनेची प्राथमिक जबाबदारी कोणाची हे निश्चित करा असा आदेश अजॉय मेहता यांना दिला होता. मुख्यमंत्र्यांनी आयुक्तांना संध्याकाळपर्यंत अहवाल सादर करण्यासंही सांगितलं आहे.

महापालिका आयुक्त अजॉय मेहता यांनी मुख्य अभियंता (दक्षता विभाग) यांना पूल दुर्घटनेची चौकशी करत २४ तासात प्राथमिक अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. यामध्ये दुर्घटनेसाठी जबाबदार महापालिका कर्मचाऱ्यांची ओळख पटवण्यास सांगण्यात आलं आहे. तसंच यामध्ये स्ट्रक्चरल ऑडिटरची भूमिका काय होती याचीही पाहणी करण्यास सांगितलं आहे. याशिवाय पूल दुर्घटनेची कारणं, पूलाची देखभाल परिस्थिती आणि स्ट्रक्चरल ऑडिट याचीही अहवालात माहिती मागवण्यात आली आहे.