बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव ओसरल्याने राज्यभरात सर्वत्र कमाल तापमानात वाढ झाली आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी ३५ अंश से. हून अधिक तापमानाची नोंद झाली असून, राजधानी मुंबईत पाऱ्याने तब्बल ३७.६ अंश से.ची पातळी गाठली. पुढील दोन दिवस तापमान वाढलेले राहणार असल्याचा हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे.

उत्तरेकडील व समुद्राच्या बाजूने येणाऱ्या वाऱ्यांचा प्रभाव वाढून शनिवारी-रविवारी राज्याच्या उत्तर भागात गारा पडतील आणि तापमानात घट होईल, अशी शक्यता आठवडय़ाच्या सुरुवातीला वेधशाळेकडून वर्तवण्यात आली होती. मात्र या दोन्ही बाजूंचे वारे तितकेसे प्रभावी ठरलेले नाही. बाष्पयुक्त वाऱ्यांचा प्रभाव नसल्याने आणि जमिनीवरून वाहणाऱ्या कोरडय़ा तप्त वाऱ्यांचा प्रभाव वाढल्याने राज्यभरातील हवा तापली आहे. विदर्भातील बहुतांश ठिकाणी दोन दिवसांपासून तापमान ३५ अंश से.वर जात आहे. अकोला येथील तापमान ३७ अंश से. वर गेले. मराठवाडा व पश्चिम महाराष्ट्रातील कमाल तापमानात गेले दोन दिवस वाढ झाली आहे. कोकण किनारपट्टीवरील सर्वच जिल्ह्य़ांमध्ये कमाल तापमान सरासरीपेक्षा चार ते पाच अंश से.ने जास्त राहिले. सोमवारीही तापमान चढे राहणार असल्याचा अंदाज आहे.

मुंबईत पाच अंश से.ने वाढ

गेल्या पाच दिवसांत मुंबईत कमाल तापमानात तब्बल पाच अंश से.ने वाढ झाली आहे. बुधवारी सांताक्रूझ येथे ३२.४ अंश से. कमाल तापमान होते तर रविवारी दुपारी तापमापकातील पाऱ्याने ३७.६ अंश से.ची पातळी गाठली. कुलाबा येथेही  ३६.५ अंश से.ची कमाल तापमानाची नोंद झाली.

तापमान

अंश से. मध्ये

२५ फेब्रु.        ३७.६

२४ फेब्रु.        ३५

२३ फेब्रु.        ३३.५

२२ फेब्रु.        ३३.५

२१ फेब्रु.        ३२.४