मार्च महिन्याच्या अखेरीस आलेली उष्णतेची लाट काहीशी ओसरल्याने राज्यातील नागरिकांना थोडा दिलासा मिळाला होता मात्र; मुंबईसह अनेक ठिकाणच्या तापमानात पुन्हा वाढ होत असून, आज, सोमवारी दुपारी मुंबईतील तापमान ३९ अंश सेल्सिअसपर्यंत जाईल, असा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तविला आहे.

मार्चअखेरीस उष्णतेची लाट ओसरल्यानंतर विदर्भ वगळता राज्यातील कमाल तापमान नियंत्रणात आले होते. मात्र पश्चिम व मध्य भारतात पुन्हा तापमान वाढणार असल्याचा अंदाज केंद्रीय वेधशाळेने व्यक्त केला आहे. मुंबईत रविवारी कमाल तापमान ३६ अंश से.वर पोहोचले होते. आज, सोमवारी ते ३९ अंश से.पर्यंत जाईल, असा अंदाज आहे. मुंबईत गेला आठवडाभर कमाल तापमान ३२ ते ३४ अंश से. दरम्यान होते. शनिवारी सांताक्रूझ येथे कमाल तापमान ३३.५ अंश से. होते. मात्र रविवारी तापमानात तीन अंश से.ने वाढ झाली. सांताक्रूझ येथे ३५.८ अंश से., तर कुलाबा येथे ३४ अंश से. कमाल तापमान नोंदले गेले. राज्याच्या इतर भागांतही कमाल तापमानात वाढ झाली.

आज, सोमवारी तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. राजस्थान, गुजरातसह मध्य प्रदेश व महाराष्ट्रात कमाल तापमान वाढणार असून राज्यात कोकण, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड व विदर्भात कमाल तापमानात ३ अंश से.ने वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात गेले आठवडाभरही कमाल तापमान ४० अंश से.वर जात असून तेथेही तापमानात आणखी वाढ होईल.