‘उबेर’ या खासगी रेडिओ टॅक्सी कंपनीच्या वाहनचालकाने दिल्लीमध्ये एका तरुणीवर बलात्कार केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी मुंबईत या कंपनीच्या महाव्यवस्थापकांवर एका व्यक्तीने हल्ला केला. शैलेश सावलानी यांच्यावर वांद्र्यातील परिवहन आयुक्तांच्या कार्यालयाबाहेर हल्ला करण्यात आला. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार हल्लेखोराने त्यांना धक्काबुक्की केली आणि त्यामध्ये ते खाली पडले.
दिल्लीत उबेर टॅक्सीसेवेच्या एका चालकाने तरुणीवर बलात्कार केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रात महिलांच्या सुरक्षेसाठी काय उपाययोजना करण्यात येतील, यावर चर्चा करण्यासाठी परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एक बैठक बोलावली होती. या बैठकीला उबेर कंपनीचे मुंबईतील महाव्यवस्थापक शैलेश सावलानी उपस्थित होते. बैठक दुपारी साडेतीनच्या सुमारास संपल्यावर ते कार्यालयातून बाहेर पडले. वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींना त्यांना प्रश्न विचारण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी एका व्यक्तीने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यांना खाली पाडले.
हल्लेखोर हा स्वाभिमानी टॅक्सी रिक्षा संघटनेचा सदस्य असल्याचे तपासात स्पष्ट झाले. कॉंग्रेस नेते नीतेश राणे यांचाही तो समर्थक आहे. मुंबईतील सर्व रेडिओ टॅक्सी बंद करण्याची मागणी त्याने परिवहन आयुक्तांकडे केली आहे.