दीड महिन्यात केवळ पाच टक्के उत्तरपत्रिकांचीच तपासणी; सर्वच परीक्षांच्या निकालांची रखडपट्टी

मुंबई विद्यापीठाच्या निकालांची रखडपट्टी इतकी शिगेला पोचली आहे की गेल्या वर्षी ५० टक्क्यांहून अधिक परीक्षांचे निकाल विलंबाने म्हणजे ४५ दिवसांची मुदत उलटल्यावर जाहीर झाले होते. यंदा तर सर्वच परीक्षांचे ऑनलाईन मूल्यांकन करण्याच्या अट्टहासापायी दीड महिना झाला तरी एकूण उत्तरपत्रिकांपैकी केवळ पाच टक्केच उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. त्यामुळे यंदा जवळपास १०० टक्के परीक्षांचा निकाल दोन महिने रखडण्याची शक्यता आहे.

ढिसाळ कारभारामुळे नेहमीच चर्चेत असणाऱ्या मुंबई विद्यापीठाचे यंदाच्या वर्षीचेही पदवी परीक्षांचे निकाल परीक्षा होऊन तब्बल दीड महिना उलटला तरी अद्याप जाहीर झालेले नाहीत. ऑनलाइनच्या मूल्यांकनातील सावळ्यागोंधळामुळे आणि प्राध्यापकांच्या सुट्टय़ांमुळे उत्तरपत्रिका तपासण्याची प्रक्रिया जून महिना सुरू झाला तरी रखडलेली होती. त्यामुळे पुढच्या शिक्षणासाठी प्रवेश घेणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांसमोर निकालाची वाट बघण्याशिवाय दुसरा पर्याय उरलेला नाही.

परीक्षा व त्यांचे निकाल याबाबत दरवर्षी होणारे गोंधळ सुधारण्याच्या दृष्टीने यंदाच्या वर्षीचे पेपर ऑनलाइन पद्धतीने तपासण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. मात्र निर्णयाची अमंलबजावणी फसल्यामुळे जून महिना सुरू होईपर्यत पेपर तपासणीची प्रक्रिया सुरूच झाली नाही. रजेवर गेलेले प्राध्यापक ५ जूनपासून रुजू झाल्यानंतर पेपर तापसणी सुरू झाली. त्यातही तपासणी करणाऱ्या तंत्रप्रणाली समजून घेणे, त्यातील अडचणी सोडवणे यामुळे अद्यापही या प्रक्रियेने जोर धरलेला नाही. आत्तापर्यत केवळ चार टक्के उत्तरपत्रिका तपासून झाल्या आहेत. अशा संथगतीने चाललेल्या या प्रक्रियेमुळे निकाल कधी जाहीर होणार, याबाबत ठोस उत्तर विद्यापीठाकडे आणि प्राध्यापक यांच्यापैकी कोणाकडेच नाही.

द्वितीय सत्र परीक्षेचे ५४ टक्के निकाल विलंबाने

महाराष्ट्र विद्यापीठ कायद्याअंतर्गत कमीत कमी तीस दिवसांत जास्तीत जास्त ४५ दिवसांत निकाल जाहीर करणे बंधनकारक असते.  मुंबई विद्यापीठ मात्र नेहमीच या बंधनाचे उल्लंघन करत आली आहे. गेल्या वर्षी म्हणजे २०१६ च्या शैक्षणिक वर्षांचे निकाल नियोजित कालावधी पेक्षा तब्बल दीड महिना उशीरा जाहीर झाल्याचे विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रक विभागाने दिलेल्या माहितीतून उघड झाले आहे. २०१६ च्या प्रथम सत्रातील ३० टक्के निकाल ४५ दिवसांनतर जाहीर झाले. द्वितीय सत्र परीक्षेचे ५४ टक्के निकाल उशीरा जाहीर झाल्याचे माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलीगली यांनी उघडकीस आणले आहे.

  • विद्यापीठाचे द्वितीय सत्रातील एकूण २१० परीक्षेचे निकाल ४५ दिवसानंतर लागले आहेत. २०१६मध्ये द्वितीय सत्रात एकूण ३८८ परीक्षा झाल्या. ३० दिवसांत ८७ निकाल म्हणजे २४.२२ टक्के निकाल जाहीर केले. यात ३२ कला, विज्ञानाचे १४, अभियांत्रिकी ३८ आणि विधीचे ३ निकाल होते. यात वाणिज्य परीक्षेचा निकाल एकही नव्हता.
  • ४५ दिवसांत ९१ म्हणजे २३.४५ टक्के निकाल जाहीर केले. त्यात २० कला, १ वाणिज्य, १५ विज्ञान, ५४ अभियांत्रिकी आणि १ विधी परीक्षेचा निकाल होता. ४५ दिवसानंतर २१० म्हणजे ५४.१२ टक्के निकाल जाहीर झाले. त्यात ५४ कला, ६० वाणिज्य, १६ विज्ञान, ६८ अभियांत्रिकी आणि १२ विधी परीक्षेचे निकाल होते.