विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीत नाव उंचावल्याचे अभिमानाने मिरविणाऱ्या मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांना मात्र चोवीस तास खुली असणारी अभ्यासिका मिळविण्यासाठीही यातायात करावी लागते आहे.
विद्यापीठाच्या कलिना येथील संकुलामध्ये ‘विद्यार्थी भवन’ या इमारतीत असलेली अभ्यासिका विद्यार्थ्यांना चोवीस तास खुली असावी, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे. गेले काही महिने विद्यापीठाच्या सामान्य प्रशासन विभागाकडे यासंदर्भात पाठपुरावा करूनही विद्यापीठ प्रशासनाकडून कोणतीही पावले उचलली न गेल्याने विद्यार्थ्यांना अभ्यासाच्या जागेबाबत अडचणींचा सामना करावा लागत आहे. दर्जा प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यापीठात विद्यार्थ्यांना चोवीस तास उपलब्ध असणारी सुसज्ज अभ्यासिका उपलब्ध नसणे धक्कादायक आहे.
कलिना संकुलात असणाऱ्या अभ्यासिकेत अनेक विद्यार्थी-विद्यार्थिनी अभ्यासासाठी येत असतात. मुख्यत: वसतिगृहांमध्ये राहणारे तसेच विविध स्पर्धा परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी या अभ्यासिकेचा वापर करतात. परंतु, ही अभ्यासिका सध्या केवळ कार्यालयीन वेळेतच सुरू असते. त्यामुळे रात्री उशिरापर्यंत किंवा पहाटे अभ्यास करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी इतरत्र जागा उपलब्ध नसल्याने अडचण निर्माण होत आहे.
याबाबत विद्यार्थ्यांनी कुलगुरू, रजिस्ट्रार, बीसीयूडी विभाग अशा संबंधित व्यक्ती व विभागांकडे सप्टेंबरपासून पत्रव्यवहारही केला आहे. त्यात विद्यार्थ्यांनी अभ्यासिकेतील सोयी-सुविधांबाबत अनेक मागण्या केल्या. अभ्यासिका चोवीस तास उपलब्ध असण्याबरोबरच त्यात वाय-फाय यंत्रणा, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वर्तमानपत्रे इत्यादी सुविधा देण्यात याव्यात, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. परंतु, यावर अद्याप कोणतीही कार्यवाही करण्यात आली नाही.

अन्यथा उपोषण
दोन वर्षांपूर्वी अभ्यासिका चोवीस तास उपलब्ध होती. त्यानंतर गेली दोन वर्षे रात्री बारापर्यंत सुरू असे. पण अचानक अभ्यासिकेची वेळ सकाळी आठ ते रात्री दहापर्यंत कमी करण्यात आली. त्यासाठी कोणतेही कारण विद्यापीठ प्रशासनाकडून देण्यात आलेले नाही, अशी माहिती विद्यार्थ्यांनी दिली. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांची तसेच विद्यापीठातील विविध विभागांच्या परीक्षांची तयारी करण्यासाठी अधिकचा वेळ द्यावा लागतो. अभ्यासिका पूर्णवेळ नसल्याने अभ्यासावर परिणाम होत असून अभ्यासिकेबाबतच्या मागण्या पूर्ण न झाल्यास उपोषणाला बसण्याचा इशारा विद्यार्थ्यांनी दिला आहे.