पुढील वर्षीपासून विद्यापीठाची परीक्षाविषयक माहिती उपलब्ध होणार

मुंबई : परीक्षेतील गोंधळ टाळण्याकरिता परीक्षेचे वेळापत्रक, त्यात आयत्यावेळेस होणारे बदल, निकाल, प्रवेशपत्राबरोबरच उत्तरपत्रिकाही पुढील वर्षीपासून ‘मोबाईल अ‍ॅप’वर उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने मुंबई विद्यापीठाने प्रयत्न सुरू केले आहेत. उत्तरपत्रिकेच्या फोटोकॉपीतून विद्यापीठाला उत्पन्न मिळत असले तरी त्यामुळे परीक्षा विभागावर येणारा ताण कमी होण्याची शक्यता आहे.

मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुहास पेडणेकर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. परीक्षेतील गोंधळामुळे विद्यापीठ कायम चर्चेत असते. आताही विद्यापीठाच्या ४९० परीक्षांपैकी ३९० परीक्षांचे निकाल जुलै अध्र्यावर आला तरी प्रलंबित आहेत. यातील काही परीक्षा तर सुरू आहेत. बीए, बीकॉम, बीएस्सी आदी महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल विद्यापीठाने जाहीर केले आहेत. मात्र विद्यापीठाच्या दूर व मुक्त अध्ययन संस्थेतर्फे घेण्यात आलेले बीकॉम, बीएस्सी आदी महत्त्वाच्या परीक्षांचे निकाल अजूनही प्रलंबित आहेत. परीक्षेचे वेळापत्रक जाहीर करण्यापासून गोंधळाचे सत्र सुरू होते. यावर तंत्रज्ञानाचा तोडगा सुचवीत अ‍ॅप सुरू करण्याची विद्यापीठाची योजना असल्याचे डॉ.पेडणेकर यांनी सांगितले. पदव्युत्तर प्रवेशांकरिता पूर्व नोंदणी प्रक्रियाही राबविण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

विद्यापीठाच्या भविष्यातील योजनांचा आढावा घेताना कुलगुरूंनी पाच वर्षांकरिता होणाऱ्या बृहद् आराखडय़ाकरिता तब्बल ३५०० सूचना आल्याची माहिती दिली. त्या त्या विषयातील तज्ज्ञ या सूचनांचा अभ्यास करत आहेत. त्यानंतर विद्यापीठाचा पाच वर्षांचा बृहद् आराखडा तयार केला जाईल, असे प्र-कुलगुरू डॉ. रवींद्र कुलकर्णी यांनी सांगितले. परीक्षाविषयक केल्या जाणाऱ्या सुधारणांविषयी परीक्षा नियंत्रक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी माहिती दिली. परीक्षेचा निकाल लागल्यानंतर लगेचच विद्यार्थ्यांना त्यांच्या उत्तरपत्रिका अ‍ॅपवर उपलब्ध करून दिल्या जातील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच उत्तरपत्रिका मूल्यांकन वेळेत पूर्ण करता यावे यासाठी प्राध्यापकांना लॅपटॉपवरच उत्तरपत्रिका उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रयत्न सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. एकूण १६ लाख ६२ हजार ७६७ उत्तरपत्रिकांपैकी १४ लाख ७६ हजार ३७९ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन पूर्ण झाले असून १ लाख ८६ हजार ३८८ उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन सुरू आहे.

महत्त्वाचे निर्णय

’ पेट ही पीएचडीसाठीची प्रवेश परीक्षा ऑनलाइन घेणार

’ परीक्षाविषयक माहिती देण्याकरिता मोबाइल अ‍ॅप

’ पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशाकरिताही पूर्व नोंदणी