मुंबई विद्यापीठात दूरस्थ शिक्षण घेणाऱ्या मुलींना परीक्षेत उत्तीर्ण करण्याच्या मोबदल्यात त्यांच्याकडे लैंगिक सुखाची मागणी करणाऱ्या निखील उर्फ नाफीस याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निखील हा मुंबई विद्यापीठातील दलाल असून विद्यार्थ्यांची विद्यापीठातील कामे तो करुन देतो, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई विद्यापीठातील एका तरुणीने बीकेसी पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला होता. यात तिने म्हटले होते की, निखील उर्फ नाफीस या तरुणाने परीक्षेत उत्तीर्ण करुन देण्याच्या मोबदल्यात शरीरसुखाची आणि पैशांची मागणी केली. शेवटी त्या तरुणीने बीकेसी पोलिसांकडे धाव घेत निखीलविरोधात तक्रार दिली.

पोलिसांनी निखीलविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखीलने अशाच पद्धतीने आणखी काही तरुणींना फसवल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी फसवणूक, सरकारी अधिकारी असल्याचे भासवणे, विनयभंग अशा विविध कलमांखाली त्याच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. निखीलचा शोध सुरु असल्याचे पोलिसांनी सांगितले. निखील हा गेल्या दोन वर्षांपासून विद्यापीठात दलाल म्हणून काम करत आहे. तो विद्यापीठाच्या आवारातच फिरत असतो, अशी माहितीही पोलिसांना मिळाली आहे.