वांद्रे पश्चिमेला लिंकिंग रोडवर असलेल्या एका इमारतीच्या सहाव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये शुक्रवारी वॉशिंग मशीनचा स्फोट झाला. या वेळी शेजाऱ्यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. नेहा चोप्रा यांच्या फ्लॅटमधील वॉशिंगमशीनचा स्फोट झाला. घटना घडली त्यावेळी त्या घरी नव्हत्या. योगा क्लासासाठी त्या बाहेर गेल्या होत्या. मिड डे ने हे वृत्त दिले आहे.

घरामध्ये त्यांची ७४ वर्षीय आई कमल सेहगल आणि मुलगी श्रेया दोघींचजणी होत्या. कमल सेहगल एका खोलीत झोपल्या होत्या तर श्रेया दुसऱ्या खोलीत होती. दोघींनी स्फोटाचा आवाज ऐकला नाही किंवा धूर पाहिला नाही. वॉशरुमच्याजवळ ही वॉशिंग मशीन ठेवली होती. घटनेच्या १५ मिनिट आधी नेहा चोप्रा १०.४५ च्या सुमारास घरातून बाहेर पडल्या.

नेहा यांचा फोन सायलंटवर असल्यामुळे त्यांना कॉल ऐकू येत नव्हता. काही वेळाने त्यांनी मोबाइल तपासला तेव्हा त्यावर शेजाऱ्यांचे त्यांना १५ मिस कॉल दिसले. जेव्हा मला याबद्दल समजले मी लगेच घरी पोहोचले. तेव्हा सर्वजण पायऱ्यांवर थांबले होते. मी आत जाऊन पाहिले तेव्हा धुरामुळे घरात अंधार पसरला होता. नेहा यांच्या शेजारी रिचा भवानी आठव्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये राहतात. त्यांच्याकडे नेहाच्या फ्लॅटची डुप्लीकेट चावी आहे. त्यांनी घरातून धूर येताना पाहिल्यानंतर लगेच खाली धाव घेतली. त्यांनी दरवाजा उघडून आई आणि मुलीला बाहेर आणले असे नेहा चोप्रा यांनी सांगितले. शेजाऱ्यांनी लगेच अग्निशमन दलाला बोलावले. अग्निशमन दलाचे जवान काही मिनिटात पोहोचले व आग विझवली.

ही इमारत मेन रोडवर असून खाली अनेक दुकाने आहेत. आग पसरुन मोठी दुर्घटना घडू शकली असती. स्फोट इतका जोरदार होता की, संपूर्ण वॉशिंग मशीनच जळून खाक झाली. २० दिवसांपूर्वीच या मशीनची दुरुस्ती करण्यात आली होती. एसी, फ्रिज, वॉशिंग मशीन, वॉटर प्युरीफायर या इलेक्ट्रॉनिक उपकरणांची वेळच्यावेळी व्यवस्थित देखभाल आवश्यक आहे असे अग्निशमन दलाने म्हटले आहे.