तलावांतील जलसाठय़ात तुलनात्मक तुटवडा; चांगल्या पावसावर पाणीपुरवठय़ाची मदार

लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून मुंबईकरांची तहान भागविणाऱ्या तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा लपंडाव सुरू असून आजघडीला गतवर्षांच्या तुलनेत तलावांतील जलसाठा तब्बल साडेतीन लाख दशलक्ष लिटरने खालावला आहे. पुढील दोन महिने पावसाची स्थिती अशीच राहिल्यास जलसाठा रोडावण्याची शक्यता आहे. परिणामी, भविष्यात मुंबईकरांना पाणी कपातीच्या संकटाचा सामना करावा लागण्याची शक्यता आहे.

अप्पर वैतरणा, मोडकसागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात तलावांमधून मुंबईकरांना दररोज ३,७५० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. मुंबईकरांची तहान भागविण्यासाठी पालिकेला पावसावरच अवलंबून राहावे लागते. यंदा सातही तलावांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा लपंडाव सुरू आहे. पालिकेकडून उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार गुरुवार, २३ जुलै रोजी तलावांमध्ये चार लाख १९ हजार ३१८ दशलक्ष लिटर पाणी जमा झाले आहे. गतवर्षी (२०१९) याच दिवशी तलावांमध्ये सात लाख ८५ हजार ०८८ दशलक्ष लिटर, तर २०१८ मध्ये तब्बल ११ लाख ८० हजार ३४१ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठी होता. गेले काही दिवस तलावक्षेत्रात तुरळक पाऊस पडत असल्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत उपयुक्त पाणीसाठय़ात तब्बल तीन लाख ६५ हजार ७७० दशलक्ष लिटर इतकी तूट आहे.

दरवर्षी १ ऑक्टोबर रोजी तलावांतील जलसाठय़ाचा आढावा घेतला जातो आणि त्यानंतर पाणीपुरवठय़ाचे गणित आखण्यात येते. तलावांमध्ये १४ लाख ४७ हजार दशलक्ष लिटर पाणीसाठा उपलब्ध असल्यास पुढील वर्षभर मुंबईकरांना सुरळीत पाणीपुरवठा करणे पालिकेला शक्य होते. मात्र आजघडीला गतवर्षीच्या तुलनेत तलावात मोठी पाणी तूट असल्याने पालिकेचा जल विभाग सतर्क झाला आहे.

पुढील दोन महिने पावसाची स्थिती अशीच राहिल्यास तलावांमध्ये पुरेसा पाणीसाठा उपलब्ध होणे अशक्य आहे. त्यामुळे भविष्यात मुंबईकरांची तहान भागविण्याचे नियोजन कसे करायचे याचा अभ्यास करण्यात येत आहे. वेळप्रसंगी मुंबईकरांच्या पाणीपुरवठय़ात कपात करावी लागेल. मात्र ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये समाधानकारक पाऊस पडला आणि जलसाठय़ाची स्थिती सुधारली तर मुंबईकरांना भविष्यात पुरेसा पाणीपुरवठा करण्यात कोणतीच अडचण येणार नाही, असे जल विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. मात्र तूर्तास पावसाने दडी मारल्याने पाणी साठा रोडावला असल्याने मुंबईकरांसमोर पाणीसंकट उभे राहणार आहे.