वाहन थांबवून तपासणी केल्याच्या कारणावरून झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर अन्य सहकाऱ्यांसोबत येऊन इब्राहिम शेख याने भररस्त्यात पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेश्राम यांना शिवीगाळी करीत त्यांच्यासोबत असलेल्या महिला शिपायाचा विनयभंग करून पोबारा केला होता. १४ जानेवारी रोजी ही घटना घडली होती. पोलिसांनी आरोपी इब्राहिम अल्लाबक्ष शेख याला अटक केली होती. त्यानंतर फरारी असलेल्या चौघांना अटक करून न्यायालयात नेले असता २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

गुन्हा करून धूम ठोकणाऱ्या आरोपी असिफ खुदूस शेख, शहाबाद शमशाद खान, मदस्सर उर्फ अफसर मुस्तकिन शेख आणि बुऱ्हाउद्दीन उर्फ बुऱ्हान मुशीउद्दीन शेख यांचा समावेश आहे. १४ जानेवारीला सोमवारी वाहतूक विभागाचे पोलीस शिपाई ज्ञानेश्वर मेश्राम आणि महिला पोलीस शिपाई पॅराडाईज सिनेमा गृहाजवळ कर्तव्य बजावत असताना संध्याकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास एक टॅक्सी वांद्रेच्या दिशेने जात होती. तिला थांबवून चौकशी करताना आरोपी इब्राहिम शेख याच्याशी मेश्राम यांची हुज्जत झाली. शाब्दिक चकमकीनंतर शेख हा अन्य चार साथीदारांच्या सोबत आला आणि मेश्राम यांना भररस्त्यात शिवीगाळी आणि महिला शिपायाचा विनयभंग केला. सदर प्रकाराची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कैलास चव्हाण यांना मिळताच ते पोलिसांसह घटनास्थळी पोहोचले. माहीम पोलीस ठाण्यात पाच जणांविरोधात सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ, विनयभंग अंतर्गत गुन्हा दाखल केला आणि काही तासांतच टॅक्सी चालक इब्राहिम शेख याला अटक केली. त्याच्या चौकशीत पोबारा करणाऱ्या अन्य चार आरोपींची नावे घेऊन पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांना न्यायालयात नेले असता त्यांना २ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.