चैत्र शुद्ध प्रतिपदा अर्थात गुढीपाडवा या सणाला आता उत्सवाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. गुढीपाडव्याला मराठी नववर्षांचे स्वागत करण्यासाठी मुंबईकर दरवर्षी उत्सुक असतात. यंदाही मुंबईच्या विविध भागात मराठी संस्कृतीचा हा उत्सव साजरा करण्यासाठी मुंबईकर सज्ज झाले आहेत. चाळी, सोसायटींमध्ये गुढी उभारण्यापासून शोभायात्रा, भव्य रांगोळ्या, ढोलताशा पथके , विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पारंपरिक खेळांचे आयोजन करत गुढीपाडवा साजरा करण्यात येणार आहे.
गेल्या काही वर्षांपासून गुढीपाडव्यानिमित्त निघणाऱ्या शोभायात्रा या सर्वाच्याच आकर्षणाचा विषय आहे. या शोभायात्रांमध्ये वेगवेगळ्या चित्ररथांतून, समूह गायन, नृत्य, लेझीम पथकांच्याद्वारे मराठी संस्कृतीचे चित्रण केले जात असते. यंदाही मुलुंड, दादर-नायगाव, वाळकेश्वर, बोरिवली, पार्ले, गिरगाव, गोरेगाव, जोगेश्वरी आदी भागांमध्ये शोभायात्रा निघणार आहेत. विविध ठिकाणच्या या शोभायात्रांमध्ये सामाजिक संदेश देणाऱ्या चित्ररथांचा, लेझीम पथकांचा समावेश असणार आहे. दहावी-बारावीच्या परीक्षा झाल्या असल्याने या शोभायात्रांना मोठय़ा संख्येने उपस्थिती राहणार आहे. यावेळी बहुतांश ठिकाणच्या शोभायात्रा व मिरवणुकींमधून राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे पाणी बचतीबाबत संदेश देण्यात येणार आहे. मुलुंडमध्ये ‘मी मुलुंडकर प्रतिष्ठान’तर्फे विविध ठिकाणच्या ढोलताशा पथकांच्या वाद्य जुगलबंदीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच येथील संभाजीराजे मैदानावर महारांगोळीही काढण्यात येणार असून यावेळी पाडव्यानिमित्त मिरवणुकीचेही आयोजन करण्यात आले आहे. तर दादर-नायगाव भागात संस्कृतीचा अभिमान व सामाजिक बांधिलकीचा संदेश देणाऱ्या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. यात पारंपरिक वेशभूषा परिधान करून परिसरातील अनेक जण सहभागी होणार आहेत. शोभायात्रेतील चित्ररथांमधून सामाजिक प्रश्नांवर जनजागृतीही करण्यात येणार आहे. वाळकेश्वर येथील तीनबत्ती, बाणगंगा तलाव परिसरात तर यंदा प्रथमच शोभायात्रा निघणार आहे. यात महिला लेझीम पथक, ढोलपथक, महिला दुचाकीस्वारांची मिरवणूकही निघणार आहे. सामाजिक-सांस्कृतिक संस्था, रहिवासी संघ सहभागी होणार आहेत.

बोरिवलीमध्ये पहिलीच स्वागतयात्रा
येत्या शुक्रवारी, ८ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त बोरिवली (प.) येथे प्रथमच हिंदू नववर्ष स्वागतयात्रा समितीच्या वतीने नववर्ष स्वागतयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. परिसरातील सुमारे ५० सामाजिक, धार्मिक, सांस्कृतिक संस्था यामध्ये सहभागी होणार असून विविध संस्थांतर्फे चित्ररथ व देखावेही सादर करण्यात येणार आहेत. गरबा नृत्य हे या स्वागतयात्रेचे आणखी एक वैशिष्टय़ असेल. चिकूवाडी येथील जॉगर्स पार्कमधून सकाळी साडेसात वाजता या स्वागतयात्रेचा प्रारंभ होईल व शिंपोली गाव येथील शीतला शंकर मंदिरात समारोप होईल. परिसरातील नागरिकांनी या यात्रेत सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

पाडव्यानिमित्त विविध ठिकाणी शोभायात्रा
‘सामाजिक समन्वय समिती’च्या विद्यमाने गुढीपाडव्यानिमित्ताने शुक्रवार ८ एप्रिल रोजी अंधेरी येथील गुंदवली गावठाण येथे शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले असून सकाळी ७ वाजता शोभायात्रेला सुरुवात होणार आहे. यावेळी विविध संप्रदाय, कला पथके, भजन मंडळे त्याचबरोबर धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक, कला-क्रीडा मंडळांचा देखावा लावण्यात आला आहे. या वर्षी समितीने प्रशिक्षित केलेल्या ५० शालेय मुलांचे पथनाटय़ शोभायात्रेचे आकर्षण ठरणार आहे.
‘शिवसह्याद्री फाऊंडेशन’च्या वतीने गुढीपाडव्यानिमित्त शुक्रवार ८ एप्रिल रोजी सकाळी ७ वाजता वरळीतील जांबोरी मैदानात शोभायात्रेचे आयोजन केले आहे. यावेळी सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सिने दिग्दर्शक सुबोध भावे यांच्या हस्ते गुढी उभारण्यात येणार असून सामाजिक, राजकीय तसेच अनेक सिने कलावंतांच्या उपस्थितीत नववर्ष स्वागत यात्रेला सुरुवात होणार आहे.