कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात आज करोना महामारीदरम्यान मुंबईतील पहिली हृदयप्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वीपणे पार पडली. हृदयप्रत्यारोपण करण्यात आलेली महिला ५३ वर्षीय असून मूळची नांदेडची आहे. या शस्त्रक्रियेमुळे संबंधित महिलेला जीवदान मिळाले आहे.

नांदेडच्या या महिलेचे हृदय निकामी झाले होते आणि हृदयाचे झालेले नुकसान भरून येण्यासारखेही नव्हते. त्यामुळे त्यांना हृदय प्रत्यारोपणाची गरज होती. गेल्या आठ महिन्यांपासून हृदय प्रत्यारोपणाच्या यादीत त्यांचे नाव समाविष्ट होते. या काळात त्यांची स्थिती आणखीनच बिकट बनत चालली होती. दरम्यान, करोनाच्या महामारीमुळे हृदय मिळण्याची शक्यताही धुसर होती. दरम्यान, १८ जुलै रोजी एका दात्याचे हृदय उपलब्ध झाले आणि करोनाचा धोका असतानाही सर्व अडथळ्यांवर यशस्वीरित्या मात करीत हृदयप्रत्यारोपणाची शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पाडली.

याविषयी सांगताना रुग्णालयाचे हृद्य आणि फुप्फुस प्रत्यारोपण केंद्राचे संचालक डॉ. नंदकिशोर कपाडिया म्हणाले, “२००९ मध्ये या रुग्णावर ओपन हार्ट व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट करण्यात आलं होतं. त्यानंतर २०१२ मध्ये त्यांची स्थिती बिघडण्यास सुरुवात झाली. गेल्या वर्षी या महिलेच्या हृद्याचे कधी न भरून येऊ शकणारे नुकसान झाल्याने गेल्या सहा महिन्यांपासून ही महिला अंथरूणास खिळून होती. त्यानंतर प्रत्यक्ष शस्त्रक्रियेदरम्यान, मोठ्या प्रमाणावर रक्तस्त्राव झाल्याने प्रत्यारोपणाची प्रक्रिया आणखी गुंतागुंतीची झाली होती. शिवाय, अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती खालावलेली असल्यामुळे सध्याची कोविडची परिस्थिती लक्षात घेता जास्त काळजी घेणे आवश्यक होते. दरम्यान, शस्त्रक्रियेच्या यशासाठी आवश्यक असलेले सर्व निकष पाळण्यात आले. त्यामुळे प्रत्यारोपण यशस्वी ठरले आणि आता रुग्णाची प्रकृती सुधारत आहे.”

ग्रीन कॉरिडॉरचं मोठं योगदान

हे यशस्वी प्रत्यारोपण वाहतूक पोलीस आणि अधिकाऱ्यांच्या पाठिंब्यामुळे यशस्वी ठरले. त्यांनी ग्रीन कॉरिडॉरची यशस्वी अंमलबजावणी करीत हृदय वेगाने आणि सुरक्षितपणे रुग्णालयात पोहोचेल याची खबरदारी घेतली. त्याचप्रमाणे दात्याच्या कुटुंबियांनीही सध्याच्या कठीण काळातही अवयवदानाचा निर्णय घेत मानवतेचे दर्शन घडवून रुग्णाचे प्राण वाचवले.