मालमत्ता कर थकवणाऱ्यांवरील कारवायांचा धडाका पालिकेने सुरू केला आहे. अतिरिक्त महापालिका आयुक्त पी. वेलरासू यांच्या मार्गदर्शनात सुरू असलेल्या या मोहिमेंतर्गत आतापर्यंत अनेक ठिकाणी आलिशान वाहनांची जप्ती करण्यात आली आहे, तर काही ठिकाणी पाणीपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

एच पूर्व विभागातील ‘भारत डायमंड बोर्स’ यांच्याकडून २५ कोटी ८६ लाख रुपये, ‘रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड’ यांच्याकडून ३९ कोटी रुपये इतका मालमत्ता कर वसूल करण्यात आला आहे. एम पश्चिाम विभागातील विकासक चंदुलाल पी. लोहना यांच्याकडे ३८ लाख ८० हजार ७०५ रुपये थकबाकी असल्याने त्यांची कार जप्त करण्यात आली होती. त्यानंतर त्यांनी १९ लाख रुपये रक्कम जमा केले.  के पूर्व विभागातील अंधेरी येथील ‘सोलिटेयर कॉर्पोरेट पार्क’ व ‘वरटेक्स बिल्डिंग’ यांच्या जलजोडण्या खंडित करण्यात आल्या. या कारवाईनंतर मालमत्ताधारकांनी अनुक्रमे ९.६० कोटी रुपये व ३१ लाख रुपये भरले.

‘आय मॅक्स थिएटर’ची मालमत्ता कराची थकबाकी ७५ लाख रुपये असल्याने संबंधित मालमत्तेची जलजोडणी खंडित करण्यात आली आहे. एम पश्चिाम विभागातील युनिटी लॅण्ड कन्सल्टन्सी यांच्याकडे १ कोटी १० लाख २२ हजार २४० रुपये इतकी थकबाकी असल्याने त्यांच्या मालकीची ‘ब्रीझा कार’ जप्त करण्यात आली. तसेच त्यांच्या  ऑफिस प्रतिबंधित (सील) करून बांधकाम बंद करण्यात आले आहे. आर्थिक वर्ष २०२०-२१ मध्ये ५ हजार २०० कोटी रुपये मालमत्ता कर जमा करण्याचे लक्ष्य असून रविवारपर्यंत ३ हजार ६५० कोटी रुपये एवढा  कर जमा झाला आहे.