भाजप आमदाराचा कारवाईत अडथळा
डोंबिवली पश्चिमेतील पालिकेच्या ह प्रभागातील तेलकोसवाडी, नेमाडे गल्ली, जुनी डोंबिवली भागातील काही अनधिकृत इमारतींचा पाणी व वीजपुरवठा पालिकेने गुरुवारी खंडित केला. रहिवाशांनी या कारवाईला तीव्र विरोध करीत संताप व्यक्त केला. मतदार नागरिकांचा कैवार घेऊन भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण तातडीने घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पालिका कर्मचाऱ्यांच्या कारवाईत अडथळा आणण्याचा प्रयत्न केला.
गुरुवारी दुपारी ही कारवाई सुरू करण्यात आली. डोंबिवलीतील २४ अनधिकृत बांधकामांचा प्रश्न विधिमंडळात गाजला. याशिवाय नगरविकास राज्यमंत्री भास्कर जाधव यांनी या बांधकामांवरील ‘जैसे थे’चे स्थगिती आदेश उठविले आहेत. त्यामुळे पालिका प्रशासनाने गुरुवारपासून या अनधिकृत इमारतींचा प्रथम वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. नंतर पोलिसांच्या मदतीने रहिवाशांना बाहेर काढून इमारती तोडण्याची कारवाई सुरू करण्यात येणार आहे.
तेलकोसवाडी, नेमाडे गल्लीतील मंगेश निवास, अरुणोदय इमारत, आर. के. पॅलेस, जुनी डोंबिवलीतील नारायण स्मृती या इमारतींचा वीज, पाणीपुरवठा खंडित करण्यात आला. रहिवासी संतप्त झाल्याने पालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. ही कारवाई संपल्यानंतर प्रभाग अधिकारी लहू वाघमारे यांनी मोबाइल बंद ठेवला

सोमवारी मोर्चा
पालिकेने अनधिकृत इमारतींचा वीज, पाणीपुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केल्याच्या निषेधार्थ सोमवार, २९ एप्रिल रोजी पालिकेच्या ‘ह’ प्रभाग कार्यालयावर आमदार चव्हाण यांनी रहिवाशांचा मोर्चा आयोजित केला आहे.